मराठमोळ्या सई ताम्हणकरने गेल्या काही वर्षांत मराठीसह बॉलीवूड चित्रपटांमध्ये स्वत:ची एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. अलीकडेच प्रदर्शित झालेल्या ‘भक्षक’ चित्रपटात अभिनेत्रीने भूमी पेडणेकरबरोबर स्क्रीन शेअर केली होती. याशिवाय सई लवकरच फरहान अख्तरच्या ‘डब्बा कार्टेल’मध्ये महत्त्वाची भूमिका साकारणार आहे. एकंदर २०२४ मध्ये सई बॉलीवूड गाजवण्यासाठी सज्ज झाली आहे. याच पार्श्वभूमीवर अभिनेत्रीने नुकतंच शिर्डीच्या साईबाबांच्या समाधीचं दर्शन घेतलं. यानंतर सईने माध्यमांशी संवाद साधला.
“येत्या काळात माझे खूप प्रोजेक्ट पडद्यावर येणार आहेत. पण, आज माझ्या आगामी प्रोजेक्ट्सपेक्षा जास्त गुरुवारचं महत्त्व आहे. माझ्या कामाबद्दल आपल्यामध्ये नेहमीच चर्चा होते. पण, मंदिरात येऊन खरंच फार छान वाटतं. मंदिरातील स्वच्छता, नियोजन या सगळ्या गोष्टी पाहून मन प्रसन्न होतं. योग्य नियोजनामुळेच प्रचंड गर्दीतही शिर्डीला आलेल्या भाविकांना चांगलं दर्शन मिळतं असा माझा अनुभव आहे.” असं सई ताम्हणकरने सांगितलं.
हेही वाचा : ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम अभिनेत्रीने खरेदी केली नवीन गाडी; फोटो शेअर करत म्हणाली, “आज एक स्वप्न…”
सईला राजकीय परिस्थिती व निवडणुकांबद्दल विचारलं असता अभिनेत्री म्हणाली, “आम्ही एखादा चित्रपट केला, तर तो किती कलेक्शन करेल याबाबत आपल्याला काहीच माहिती नसते. तसंच राजकारणात सुद्धा आहे. हा सगळा वेट अँड वॉचचा गेम आहे. येत्या काळात आपल्यासमोर चित्र स्पष्ट होईलच. राजकारणात आता नवीन पिढी येऊ पाहतेय आणि नवीन विचारसरणी सुद्धा रुजू होऊ पाहत आहेत. गेल्या काही वर्षांत आपण डिजिटली खूप प्रगती केलीये आणि ही चांगली गोष्ट आहे. बाकी इतर गोष्टी येत्या काळात स्पष्ट होतील.”
हेही वाचा : मोहन जोशींना यंदाचा ‘झी जीवन गौरव’ पुरस्कार प्रदान! म्हणाले, “आताच्या नव्या पिढीने…”
दरम्यान, सई शेवटची सिद्धार्थ चांदेकरबरोबर ‘श्रीदेवी प्रसन्न’ या चित्रपटात झळकली होती. आता लवकरच ‘भक्षक’नंतर ती ‘डब्बा कार्टेल’मधून प्रेक्षकांचं मनोरंजन करण्यासाठी सज्ज होणार आहे.