आजवर आपल्या बोल्ड आणि बिनधास्त भूमिकांनी प्रेक्षकांचं मनोरंजन करणारी अभिनेत्री म्हणजे सई ताम्हणकर (Saie Tamhankar). सईने अनेक चित्रपट व वेबसीरिजमधून मराठीसह हिंदी प्रेक्षकांचं मनोरंजन केलं आहे. त्यामुळे तिच्या अभिनयाचे अनेक चाहते आहेत. आपल्या अभिनयाने चर्चेत राहणारी सई गेल्या काही दिवसांपासून एका कारणाने चर्चेत आली आहे आणि या चर्चांचं कारण म्हणजे ‘लावणी’.
अभिनेत्री सई ताम्हणकर पहिल्यांदाच मोठ्या पडद्यावर लावणी सादर करताना दिसणार आहे. ‘देवमाणूस’ या चित्रपटातील ‘आलेच मी’ या गाण्यावर पहिल्यांदाच सईने फक्कड अशी लावणी सादर केली आहे. सईच्या या पहिल्या वहिल्या लावणीला चाहत्यांकडूनही चांगलाच प्रतिसाद मिळत आहे. या लावणीवर अनेक चाहते आणि नेटकरी नृत्य सादर करत आहेत. त्यांच्या नृत्याचे व्हिडीओ ते सोशल मीडियावर शेअर करत आहेत.
अशातच गौतमी पाटीललादेखील (Gautami Patil) सईच्या लावणीची भुरळ पडली आहे. गौतमीने आजवर तिच्या लावणीवरील नृत्यांनी प्रेक्षकांवर मोहिनी घातली आहे. आता तिने सईच्या ‘आलेच मी’ या गाण्यावर खास लावणी नृत्य सादर केलं आहे. गौतमीने तिच्या लावणीचा व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला असून अवघ्या काही क्षणांत चाहत्यांनी या व्हिडीओला लाईक्स आणि कमेंट्सद्वारे चांगलाच प्रतिसाद दिला आहे. तर सईने देखील गौतमीच्या या व्हिडीओवर “विषय कट” अशी कमेंट केली आहे.
‘देवमाणूस’मधील या लावणी नृत्यासाठी सईने ३३ तास सराव केल्याचे म्हटलं आहे. याबद्दल तिने असं म्हटलं की, “लावणी करणं हा माझ्यासाठी एक विलक्षण अनुभव होता. हा माझा एक नवीन प्रयत्न होता आणि मला खूप मजा आली. आशिषच्या मार्गदर्शनाशिवाय इतकी प्रभावी लावणी साकारता आलीच नसती. लव फिल्म्स आणि तेजस यांनी मला या भूमिकेसाठी निवडलं, याबद्दल मी खूप आभारी आहे.”
दरम्यान, मराठी संगीतसृष्टीत आपली खास ओळख असणाऱ्या बेला शेंडेचा दमदार आवाज ‘आलेच मी’ या लावणीला लाभला असून गायक रोहन प्रधानने तिला साथ दिली आहे. संगीतकार रोहन-रोहन यांनी गाण्याला संगीत दिलं आहे. तर लोकप्रिय नृत्यदिग्दर्शक आशिष पाटीलने या गाण्याची नृत्यरचना केली आहे. सईने केलेली लावणी ‘देवमाणूस’ या चित्रपटातील आहे.
‘देवमाणूस’ हा चित्रपट २५ एप्रिल २०२५ रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. लव फिल्म्सच्या लव रंजन आणि अंकुर गर्ग यांची निर्मिती असलेला आणि तेजस देऊस्कर दिग्दर्शित या चित्रपटात महेश मांजरेकर, रेणुका शहाणे, सुबोध भावे आणि सिद्धार्थ बोडके यांच्या प्रमुख भूमिका आहेत.