दिग्दर्शक नागराज मंजुळे यांच्या ‘सैराट’ या चित्रपटामुळे प्रसिद्धीझोतात आलेले दोन कलाकार म्हणजे आर्ची आणि परश्या. आर्चीची भूमिका साकारणारी रिंकू राजगुरू आणि परश्या ही भूमिका साकारणारा आकाश ठोसर हे दोघेही कायमच चर्चेत असतात. अभिनेता आकाश ठोसर हा लवकरच घर, बंदूक, बिरयानी या चित्रपटात झळकणार आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन नागराज मंजुळे करत आहेत. त्यात आता आकाश ठोसरच्या लग्नाची जोरदार चर्चा रंगली आहे.
गेल्या काही दिवसांपासून सिनेसृष्टीत लग्नाचे वारे वाहत आहेत. अभिनेता आकाश ठोसर हा लवकरच विवाहबंधनात अडकणार असल्याची चर्चा सध्या सुरु आहे. नुकतंच त्याने त्याच्या आगामी चित्रपटाच्या निमित्ताने एक मुलाखत दिली. या मुलाखतीत त्याला तुला स्वयंपाक बनवता येतो का? असे विचारण्यात आले होते. त्यावर त्याने स्वयंपाक घरातील काही आठवणी ताज्या केल्या. त्याबरोबरच त्याने त्याला लग्नासाठी कशी मुलगी हवी आहे? याबद्दलही स्पष्टीकरण दिले.
आणखी वाचा : आर्या आंबेकरला झाला घशाचा संसर्ग, स्वत: दिली माहिती, म्हणाली “मी माझे…”
“मला स्वतःला स्वयंपाक खूप छान बनवता येतो. कारण मी पाच वर्ष तालीम राहिलो आहे. त्या ठिकाणी तु्म्हाला तुमचे जेवण हे स्वत:लाच बनवायला लागतं. त्यामुळे आम्ही प्रत्येकजण स्वत:चे जेवण स्वत: बनवायचो. त्यामुळे मी पोळी, भाजी, बिरयानी असा सर्व स्वयंपाक खूप छान बनवू शकतो”, असे आकाशने यावेळी सांगितले.
“यामुळे मला लग्नासाठी अशी मुलगी हवी आहे जिला बिरयानी खूप छान बनवता येईल. मला तिच्याशी लग्न करायला नक्की आवडेल. कारण ज्या मुलीला बिरयानी बनवता येते, तिला कुठलाही स्वयंपाक बनवता येऊ शकतो”, असे तो म्हणाला.
आणखी वाचा : “प्रत्येक फोटोमध्ये…”, रिंकू राजगुरुने आकाश ठोसरबद्दल शेअर केलेली ‘ती’ पोस्ट चर्चेत
दरम्यान आकाश ठोसर हा लवकरच ‘घर बंदूक बिरयानी’ या चित्रपटात झळकणार आहे. येत्या ७ एप्रिल रोजी हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. सयाजी शिंदे, नागराज मंजुळे आणि आकाश ठोसर यांच्या या चित्रपटात प्रमुख भूमिका आहेत. नुकतंच या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला आहे.