दिग्दर्शक नागराज मंजुळे यांच्या ‘सैराट’ चित्रपटामुळे आकाश ठोसर प्रसिद्धीच्या झोतात आला. या चित्रपटामुळे त्याला प्रेक्षकांचं भरभरुन प्रेम मिळालं. त्याने साकारलेलं परश्या हे पात्र आजही प्रेक्षकांच्या आठवणीत आहे. या चित्रपटानंतर आकाशने हिंदी वेबसीरिजमध्येही काम केलं. तसेच इतर काही मराठी चित्रपटही त्याने केले. आता तो ‘घर बंदूक बिरयानी’ चित्रपटामुळे चर्चेत आला आहे.
अभिनेते-दिग्दर्शक नागराज मंजुळे व सयाजी शिंदे यांची मुख्य भूमिका असलेला ‘घर बंदूक बिरयानी’ चित्रपट ७ एप्रिलला सर्वत्र प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटामध्ये आकाश महत्त्वाच्या भूमिकेमध्ये आहे. या चित्रपटानिमित्त ‘घर बंदूक बिरयानी’च्या टीमने ‘लोकसत्ता ऑनलाइन’च्या ‘डिजिटल अड्डा’मध्ये हजेरी लावली होती. यावेळी कलाकारांनी दिलखुलासपणे अनेक गोष्टींवर भाष्य केलं.
आणखी वाचा – “आज त्याच्याकडे फेम आहे पण…” एमसी स्टॅनच्या वागणुकीवर भडकले पुण्याचे गोल्डन बॉईज, म्हणाले, “गर्व…”
यावेळी आकाशने त्याच्या वडिलांची एक आठवण सांगितली. आकाशला वडील नाही पण त्यांच्या आशिर्वादामुळेच मी आजवर इथवर पोहोचलो असं तो म्हणतो. वडिलांचा उल्लेख करत आकाश म्हणाला, “माझ्या वडिलांना चित्रपटांची खूप आवड होती. तू अभिनेता झालं पाहिजे असं ते मला कधीच बोलले नाही. पण मी अभिनेता व्हावं हे त्याचं बहुदा स्वप्न असावं”.
“मला एक किस्सा सांगायचा आहे की, मी एकदा ट्रेनने प्रवास करत होतो. माझे बाबाही त्याच ट्रेनने प्रवास करत होते. पण बाबा व मी एकाच ट्रेनमध्ये आहोत हे मला माहित नव्हतं. तेव्हा ते घरी येऊन आईला बोलले होते की, आपला मुलगा किती छान दिसत आहे. कोणीतरी याला चित्रपटांमध्ये घेतलं पाहिजे. आता माझे वडील माझ्याबरोबर नाही. पण ही आठवण मला माझ्या आईने सांगितली”. पुढे तो म्हणाला, “आईने जेव्हा मला हा किस्सा सांगितला तेव्हा मला हे ऐकून खूप भारी वाटलं. त्यांचं स्वप्न व त्यांचीच पुण्याई आहे ज्यामुळे आज मी इकडे आहे”. आकाशचं त्याच्या आई-वडिलांवर अगदी जीवापाड प्रेम आहे हे त्याच्या बोलण्यामधून दिसून आलं.