नागराज मंजुळे यांच्या ‘सैराट’ने (Sairat) केवळ महाराष्ट्रालाच नव्हे तर अवघ्या देशाला याड लावलं. या चित्रपटातील ‘झिंगाट’ गाण्याची झिंग तर अजूनही प्रेक्षकांच्या मनावर कायम आहे. नागराज मंजुळेंचं (Nagraj Manjule) दमदार दिग्दर्शन, कलाकारांचा सशक्त अभिनय आणि अजय-अतुल (Ajay-Atul) यांच्या बहारदार संगीताने ‘सैराट’ने प्रेक्षकांच्या मनावर गारुड घातलं. २०१६ मध्ये आलेल्या ‘सैराट’ने बॉक्स ऑफिसवर जवळपास १०० कोटींहून अधिकची कमाई केली आहे. त्यामुळे हा चित्रपट मराठी मनोरंजन विश्वातील एक मैलाचा दगड ठरला. ९ वर्षांनी ‘सैराट’ची ही जादू आता प्रेक्षकांना पुन्हा एकदा अनुभवता येणार आहे. कारण येत्या २१ मार्च रोजी ‘सैराट’ पुन्हा प्रदर्शित होणार आहे. नुकतीच झी स्टुडिओजने याबद्दलची घोषणा केली.

‘सैराट’च्या या पुनःप्रदर्शनाबद्दल दिग्दर्शक नागराज मंजुळे (Nagraj Manjule) म्हणतात, “आम्ही चित्रपटाची निर्मिती केली तेव्हा विचारही केला नव्हता या चित्रपटाला प्रेक्षक डोक्यावर घेतील. आम्ही प्रामाणिकपणे काम केले होते. ‘सैराट’ने (Sairat) महाराष्ट्रातच नाही तर भारतभर प्रेक्षकांच्या मनात स्थान निर्माण केलं आणि आज पुन्हा एकदा आमचा हा चित्रपट प्रदर्शित करण्याची संधी मिळतेय. याहून आनंद काय असू शकतो? यासाठी मी झी स्टुडिओजला मनापासून धन्यवाद देतो. चित्रपटाच्या पुन:प्रर्शनामुळे आम्हाला पुन्हा एकदा तोच अनुभव, तीच उत्सुकता आणि प्रेक्षकांचं भरभरून प्रेम मिळेल, याची मला खात्री आहे.”

रिंकू राजगुरू (Rinku Rajguru) म्हणते, “’सैराट’ (Sairat) हा चित्रपट माझ्या आयुष्याचा अविभाज्य भाग आहे. आर्ची या भूमिकेला प्रेक्षकांनी भरभरून प्रेम दिलं. या चित्रपटाने मला फक्त ओळख नाही, तर प्रेक्षकांच्या मनात एक खास जागाही दिली. ‘सैराट’ पुन्हा प्रदर्शित होत आहे याचा मला खूप आनंद आणि अभिमान आहे. चित्रपटाचे दिग्दर्शक नागराज मंजुळे यांनी माझ्यावर विश्वास दाखवून मला या चित्रपटात काम करण्याची संधी दिली यासाठी मी त्यांची कायम आभारी असेन.”

आकाश ठोसर (Akash Thosar) म्हणतो, “’सैराट’ (Sairat) हा माझ्या करिअरचा पहिला आणि आजवरचा सर्वात महत्त्वाचा टप्पा आहे. परश्या या व्यक्तिरेखेने मला प्रेक्षकांच्या मनात एक वेगळी ओळख दिली. ‘सैराट’च्या माध्यमातून आमच्या टीमने जे यश मिळवले, ते आजही आठवणीत आहे. ‘सैराट’चे पुन:प्रदर्शन होणं ही खूप आनंदाची गोष्ट आहे. मला खात्री आहे, की प्रेक्षक पुन्हा एकदा या चित्रपटाला तितक्याच प्रेमाने स्वीकारतील.”

संगीतकार अजय-अतुल (Ajay-Atul) म्हणतात, “’सैराट’ (Sairat) हा चित्रपट खूप गाजला. त्यातील गाणी आजही प्रेक्षकांच्या मनावर राज्य करत आहेत. ‘सैराट’च्या कथानकामुळे आम्हाला गाणी करताना एक वेगळीच ऊर्जा मिळाली आणि त्यामुळेच ‘सैराट’मधली सगळीच गाणी आजही सुपरहिट आहेत. तीच ऊर्जा घेऊन पुन्हा चित्रपट प्रदर्शित होत आहे आणि आम्हाला खात्री आहे, जसं त्यावेळी प्रेक्षकांनी चित्रपटाला भरभरून प्रेम आणि प्रतिसाद दिला तसाच आताही मिळेल.”

झी स्टुडिओजचे बिझनेस हेड बवेश जानवेलकर म्हणतात, “‘सैराट’ (Sairat) चित्रपटाने मराठी सिनेसृष्टीला एक अनोखी ओळख दिली आहे आणि तोच चित्रपट आता पुन्हा एकदा प्रदर्शित होत आहे. कथानक, कलाकार, संगीत, चित्रीकरण अशा सगळ्याच बाजू जमेच्या आहेत. आजही हा चित्रपट प्रेक्षकांमध्ये तितकाच लोकप्रिय आहे. मला खात्री आहे की, ‘सैराट’च्या (Sairat) पुनःप्रदर्शनालाही प्रेक्षकांचा तसाच उत्स्फूर्त प्रतिसाद असेल.”

Story img Loader