International Women’s Day 2025: ८ मार्चला सर्वत्र आंतरराष्ट्रीय महिला दिन साजरा केला जातो. या दिवशी महिलांची थोरवी, महिलांची गोडवी गायली जातात. पण हे एका दिवसापुरते मर्यादित न राहता सातत्याने केलं पाहिजे. कारण ‘ती’च्या शिवाय जे जीवन शून्य आहे. महिला दिनानिमित्ताने कलाकार मंडळी सोशल मीडियाच्या माध्यमातून शुभेच्छा देत आहेत. लोकप्रिय संगीतकार, गीतकार, गायक आणि राष्ट्रीय पुरस्कार विजेते सलील कुलकर्णी यांनी नुकतीच महिला दिनानिमित्ताने सुंदर पोस्ट शेअर केली आहे.

सलील कुलकर्णी सोशल मीडियावर खूप सक्रिय असतात. कामाव्यतिरिक्त वैयक्तिक आयुष्यात घडणाऱ्या गोष्टींबाबत शेअर करत असतात. तसंच आजूबाजूला घडणाऱ्या घडामोडींविषयी परखड मत व्यक्त करत असतात. नुकतंच त्यांनी मुलगा शुभंकर कुलकर्णीचा व्हिडीओ शेअर करत महिला दिनानिमित्ताने खास पोस्ट लिहिली आहे.

सलील कुलकर्णींची पोस्ट वाचा…

‘ती’ एका बाजूला .. ‘तिचं’ कणखर रूप खूप लहानपणापासून पाहिलंय…आईबरोबर आमचा बाबा होऊन जेव्हा तिने एकटीच्या बळावर पेललं आभाळ. आणि पिल्लांना कसलीही झळ लागू दिली नाही. सायीसारखी मऊ आजी झालीये आता, पण अजूनही आयुष्याच्या डोळ्याला डोळा देऊन ती घराला जपते आहे आणि एका बाजूला “बाबा ..मी सगळं नीट करते, तू काळजी करू नकोस,” असं म्हणणारी बाबाची मुलगी होऊन सुद्धा बाबाला सांभाळणाऱ्या ‘तिला’ पाहतोय.

अनेकांच्या चष्म्यावर वर्षानुवर्षे साचलेली धूळ साफ करावीशी वाटलीच…तर साफ करा आणि पाहा ती .. चांद्रयानापासून क्रिकेटपर्यंत आणि वैद्यकीय क्षेत्रापासून पोलिस दलापर्यंत… ‘ती’ आपलं घर, समाज , देश सगळं सांभाळू शकते…फक्त तिला आनंदाने जगू द्या… ‘तू छान दिसतेस’च्या पुढे जाऊन ‘तुझं काम उत्तम आहे’ असं म्हणूया?

गायिकेला गाण्यासाठी आणि कवयित्रीला कवितेसाठी दाद देऊया… फक्त तिच्या फोटोला ‘गॉर्जस’ म्हणण्यापेक्षा…घरात, समाजात आणि सोशल मीडियावर सुद्धा…ती मोकळेपणाने तिचं मत व्यक्त करू शकेल, असं वातावरण ठेवूया? तिला एखाद्याला ‘लग्नापासून’ ते फेसबुकच्या फ्रेंड रिक्वेस्टपर्यंत ‘नाही’ म्हणण्याचा अधिकार आहे याचा आदर करूया? तिला एक दिवस डोक्यावर घेण्यापेक्षा, कायम आपल्याबरोबर उभं करूया? … मनांत आणि जगात सुद्धा ..

आपल्या आसपासच्या स्त्रियांना त्यांच्या अस्तित्वाला फुलू द्यायला मदत नाही करता आली तर किमान अडवणूक तरी नको करायला…त्यांच्या स्वप्नांना पंख वगैरे द्यायला जमत नसतील तर किमान त्या वर उडत असताना खालून दगड मारला नाही तर बरंय..’तिला’ सुरक्षित वाटतं नाही हा समाजातल्या पुरुषांचा पराभव आहे…आपण आपल्या मुलांवर संस्कार करायला हवेत…जेणेकरून मुलींच्या आईबाबांना शांत वाटेल, सुरक्षित वाटेल…महिला दिनाच्या शुभेच्छा.

डॉ .सलील कुलकर्णी.

माझा प्रिय मित्र स्वानंद किरकिरेने लिहिलेलं आणि राम संपतने संगीतबद्धल केलेलं हे माझं आवडतं गाणं आहे. जेव्हा शुभंकर हे गाणं गातो तेव्हा मला खूप आवडतं.

दरम्यान, सलील कुलकर्णींच्या या पोस्टवर अनेक चाहत्यांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. त्यांच्या पोस्टबरोबरच शुभंकरने सादर केलेल्या गाण्याचं कौतुक करत आहेत. सलील कुलकर्णींची ही पोस्ट सोशल मीडियावर चांगलीच चर्चेत आली आहे.