बॉलिवूड इंडस्ट्रीतील लोकप्रिय अभिनेता म्हणून रितेश देशमुखला ओळखले जाते. आज १७ डिसेंबर रोजी तो त्याचा ४४ वा वाढदिवस साजरा करत आहे. यानिमित्ताने त्याला त्याचे अनेक सहकलाकार तसेच त्याचे चाहते शुभेच्छा देत आहेत. या खास प्रसंगाचे औचित्य साधत बॉलिवूडचा भाईजान सलमान खानने रितेश देशमुखला वाढदिवसाच्या अनोख्या पद्धतीने शुभेच्छा दिल्या आहेत. सलमान खानने रितेशच्या आगामी चित्रपटातील गाण्याची एक झलक शेअर केली आहे.
अभिनेता रितेश देशमुख आणि जिनिलीया देशमुख यांचा वेड हा चित्रपट लवकरच प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटामुळे ते दोघेही सातत्याने चर्चेत आहेत. काही दिवसांपूर्वीच या चित्रपटाचा टीझर, गाणी प्रदर्शित झाली आहेत. या चित्रपटाच्या टीझरमध्ये रितेश व जिनिलीयाची केमिस्ट्री पाहून प्रेक्षक थक्क झाले. आता या चित्रपटातील वेड लावलंय या गाण्याचा टीझर समोर आला आहे. यात सलमान खान हा पाहुण्या कलाकाराच्या भूमिकेत दिसत आहे.
आणखी वाचा : “वेड आहे म्हणून…” जिनिलियाने सांगितले मराठी सिनेसृष्टीत पदार्पण करण्यामागचे खरं कारण
सलमान खानने नुकतंच इन्स्टाग्रामवर वेड चित्रपटातील वेड लावलंय या गाण्याचा टीझर प्रदर्शित केला आहे. या गाण्यात रितेश देशमुखबरोबर सलमान खानही दिसत आहे. या गाण्याच्या टीझरमधील दोघांचा स्वॅग चाहत्यांना खूप आवडला आहे. रितेश देशमुखच्या चित्रपटात सलमान खान एका खास भूमिकेत दिसणार आहे. या गाण्याचा टीझर शेअर करताना सलमान खानने चक्क मराठीत कॅप्शन दिले आहे.
“भाऊचा वाढदिवस आहे… मग भेट तर दिली पाहिजे ना…” असे कॅप्शन सलमानने वेड गाण्याच्या टीझरला दिले आहे. सलमान खान आणि रितेश देशमुख यांच्यात खूप चांगले बॉन्डिंग आहे. रितेश देशमुखच्या अनेक चित्रपटात सलमान खान हा पाहुण्या कलाकाराच्या भूमिकेत दिसला आहे.
आणखी वाचा : Ved Teaser : “…तर काही प्रेमातलं वेड होतात” रितेश-जिनिलीयाच्या चित्रपटाचा उत्कंठावर्धक टीझर!
दरम्यान ‘वेड’ या मराठी चित्रपटातून रितेश देशमुख हा दिग्दर्शनात पदार्पण करत आहे. या चित्रपटात त्याची पत्नी जिनिलीया दिसणार आहे. तर दुसरीकडे येत्या २०२३ ला सलमान खान हा दोन मोठ्या चित्रपटात दिसणार आहे. सलमान खानचा ‘किसी का भाई किसी की जान’ हा चित्रपट ईद दिवशी प्रदर्शित होणार आहे. तर ‘टायगर 3’ हा चित्रपट दिवाळीला प्रदर्शित होणार आहे.