मराठीसह बॉलीवूडमध्ये स्वत:ची वेगळी ओळख निर्माण करणारे मराठमोळे दिग्दर्शक म्हणून समीर विद्वांस यांना ओळखलं जातं. ‘आनंदी गोपाळ’, ‘डबलसीट’, ‘टाईमप्लीज’, ‘क्लासमेट्स’, ‘लोकमान्य’, ‘लग्न पहावे करून’ अशा बऱ्याच चित्रपटांमधून त्यांनी प्रेक्षकांचं मनोरंजन केलं. कलाविश्वाबरोबरच समीर विद्वांस अनेकदा सामाजिक व राजकीय घडामोडींवर भाष्य करतात. सध्या त्यांनी शेअर केलेली एक्स पोस्ट चर्चेत आली आहे.
लोकसभेच्या निवडणुकीचा कार्यक्रम शनिवारी १६ मार्चला जाहीर करण्यात येणार आहे. तारखांची घोषणा होताच आचारसंहिता लागू होणार आहे. सध्या महत्त्वाच्या पक्षांकडून जाहिरातीच्या माध्यमातून प्रचार करण्यात येत आहे. याच पार्श्वभूमीवर दिग्दर्शक समीर विद्वांस यांनी एक्स पोस्ट शेअर केली आहे.
“सगळ्या FM चॅनल्सवरच्या कंटाळवाण्या जाहिराती पुढचे २, ३ महिने डोक्यात ही जाणार! सुरूवात तर झालेली आहेच. अतोनात पैशांच्या जोरावर ओंगळवाणा भडिमार…” असं दिग्दर्शकाने त्याच्या पोस्टमध्ये म्हटलं आहे.
हेही वाचा : आलिया भट्ट : नेपोटिझमचा ठपका पुसून ट्रोलर्सना हसतमुखाने सामोरी जाणारी बहुरंगी अभिनेत्री
समीर विद्वांस यांच्या पोस्टवर एका युजरने “केवळ FM चं नव्हे तर न्यूजपेपरमध्ये सुद्धा…दररोज युपी-उत्तराखंडच्या जाहिराती पाहायला मिळत आहेत अशी प्रतिक्रिया दिली आहे.” दरम्यान, दिग्दर्शकाच्या कामाबद्दल सांगायचं झालं, तर त्यांनी गेल्यावर्षी बॉलीवूडमध्ये दिग्दर्शित केलेल्या ‘सत्यप्रेम की कथा’ या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर चांगली कामगिरी केली होती. याशिवाय यंदाचे बरेच महत्त्वपूर्ण पुरस्कार या चित्रपटाने पटकावले आहेत.