मराठी नाटक, टीव्ही मालिका लिहिणारा एक मराठी लेखक सांस्कृतिक कार्य विभागाकडे कलाकार असल्याचे प्रमाणपत्र मागायला गेला. पण ‘सांस्कृतिक विभाग लेखकांना कलाकार मानत नाही. त्यामुळे त्यांना कलाकार प्रमाणपत्र आम्ही देऊ शकत नाही,’ असं अधिकाऱ्याने त्या लेखकाला म्हटलं. लेखकाला म्हाडा प्राधिकरणाच्या कलाकार कोट्यातून लॉटरीमध्ये घर लागलं आहे. पण ज्या लेखकांना या अगोदर घरं मिळाली आहेत, त्यांच्याकडून ती परत घेण्यासाठी आम्ही म्हाडाला पत्र लिहू, असंही त्या अधिकाऱ्याने म्हटलं. यानंतर सोशल मीडियावर मराठी कलाकार नाराजी व्यक्त करत आहेत.
‘सत्यप्रेम की कथा’ चित्रपटाचे मराठमोळे दिग्दर्शक समीर विद्वांस यांनी ‘महाराष्ट्र टाइम्स’मधील बातमी शेअर करत पोस्ट केली आहे. समीर यांनी लिहिलं, “बरोबरच आहे! लेखक कलाकार नाहीतच! सगळे दिग्दर्शक, अभिनेते स्वयंभू आहेत! स्टेजवर, स्क्रीनवर येऊन ते बाराखडी आणि पाढेच म्हणतात. लेखन ही कला थोडीच आहे? किराणा मालाची यादी आणि संहिता यात काहीच फरक नाही. अच्छा ते स्टेजवर भाषणं देणाऱ्या नेत्यांना अधिकृत कलाकार मानायचं का आता.” समीर विद्वांस यांची ही उपरोधिक पोस्ट चांगलीच चर्चेत आहे.

शशांक केतकरची पोस्ट
याचबरोबर मराठी अभिनेता शशांक केतकर यानेही पोस्ट करत प्रतिक्रिया दिली आहे. “सरकारी जाहिराती लिहायला लेखक लागतात ना?” असा प्रश्न विचारत शशांक केतकरने नाराजी व्यक्त केली आहे.
सर्वोच्च न्यायालयात दाखवला जाणार ‘लापता लेडीज’, सरन्यायाधीशांनी सांगितलं स्क्रीनिंगचं कारण

सोशल मीडियावर कलाकार याविरोधात पोस्ट करत आहेत. लेखकांचं कला क्षेत्रात महत्त्वाचं स्थान आहे, त्यांनाच अशी वागणूक दिली जात असल्याने कलाकार संताप व्यक्त करत आहेत.