मनोरंजन सृष्टीतील कलाकारांची सतत कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चा होत असते. चित्रपट, सोशल मीडियावर शेअर केलेल्या पोस्ट आणि मुलाखतीदरम्यान केलेली वक्तव्ये अशा अनेक कारणांमुळे कलाकारांची चर्चा होताना दिसते. आता अभिनेत्री क्रांती रेडकरचे पती समीर वानखेडेंनी तिचे कौतुक केल्याने हे जोडपे सध्या चर्चेत आले आहे.
काय म्हणाले समीर वानखेडे?
अभिनेत्री क्रांती रेडकर आणि समीर वानखेडे यांनी नुकतीच ‘सन मराठी’च्या ‘होऊ दे चर्चा कार्यक्रम आहे घरचा’ या शोमध्ये हजेरी लावली होती. त्यावेळी समीर वानखेडे यांनी क्रांती रेडकरच्या धाडसाचे कौतुक केले आहे. त्यांनी म्हटले, “फेब्रुवारी-मार्चमध्ये क्रांतीला आमच्या मुलांबद्दल, माझ्याबद्दल मोबाइलवर धमक्या यायच्या, त्यानंतर त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात आली. पण, एका महिलेला फक्त या कारणासाठी की, ती माझी अर्धांगिनी आहे; त्यासाठी तिला घाबरवण्यासाठी धमक्या दिल्या जात होत्या. ती माणूस आहे, या सगळ्या प्रकारामुळे तीदेखील अस्वस्थ झाली होती. पण, देवाच्या कृपेने क्रांती खूप धाडसी आहे. त्यामुळे त्या परिस्थितीचा तिने योग्य प्रकारे सामना केला. मी तिला म्हणत असतो, तू झाशीची राणी आहे. मी लोकांना सांगायचो की तुम्ही माझ्यापर्यंत नंतर पोहोचणार, आधी तुम्हाला माझ्या लक्ष्मी आणि दुर्गाला सामोरे जावे लागणार.”
समीर वानखेडे हे आयआरएस अधिकारी आहेत. शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानला ड्रग्ज प्रकरणात अटक केल्यानंतर त्यांची मोठी चर्चा झाली होती.
क्रांती रेडकर ही अभिनेत्री असण्याबरोबरच दिग्दर्शिका आणि लेखिकादेखील आहे. २००० मध्ये ‘सून असावी अशी’ या चित्रपटातून अभिनयसृष्टीत तिने पदार्पण केले. ‘जत्रा’ चित्रपटातील ‘कोंबडी पळाली’ गाण्यातून तिची वेगळी ओळख निर्माण झाली. ‘काकण’ हा तिचा दिग्दर्शनातील पहिला चित्रपट होता. यात उर्मिला कानेटकर आणि जितेंद्र जोशी हे मुख्य भूमिकेत दिसले होते. हा चित्रपट प्रेक्षकांच्या पसंतीस उतरल्याचे पाहायला मिळाले होते.
दरम्यान, क्रांती सोशल मीडियावर सक्रिय असते. ज्या मजेशीर पद्धतीने ती तिच्या मुलींचे किस्से सांगत असते, त्याचा चाहता वर्ग निर्माण झाल्याचे पाहायला मिळत आहे.