‘समाजातील प्रत्येक स्त्री सुशिक्षित झालीच पाहिजे’ असा आग्रह ज्यांनी केला ते महात्मा ज्योतिबा फुले आणि त्यांच्या खांद्याला खांदा लावून ज्यांनी स्त्री शिक्षणाचा पाया रचला अशा सावित्रीबाई फुले यांच्या जीवनावर आधारित ‘सत्यशोधक’ हा चित्रपट ५ जानेवारीला संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाच्या दिग्दर्शनाची धुरा नीलेश जळमकर यांनी संभाळली असून चित्रपटात महात्मा फुलेंची भूमिका अभिनेता संदीप कुलकर्णी तर अभिनेत्री राजश्री देशपांडे हिने सावित्रीबाईंची भूमिका साकारली आहे. या चित्रपटाच्या निमित्ताने ‘सत्यशोधक’चे दिग्दर्शक नीलेश जळमकर, निर्माते भीमराव पट्टेबहादूर, अभिनेता संदीप कुलकर्णी आणि राजश्री देशपांडे यांनी ‘लोकसत्ता’शी संवाद साधला.

या चित्रपटाबद्दल बोलताना दिग्दर्शक नीलेश जळमकर म्हणाले, माणसाला माणूस म्हणून जगायला शिकवणाऱ्या महात्मा फुलेंची गोष्ट आम्ही साध्या पद्धतीने या चित्रपटात मांडली आहे. थॉमस पेन लिखित ‘राइट्स ऑफ मॅन’ वाचून एका १३ वर्षांच्या मुलामध्ये ज्योती ते महात्मा फुले हा बदल कसा झाला हे आम्ही या चित्रपटातून प्रेक्षकांसमोर मांडण्याचा प्रयत्न केला आहे. त्यांनी जात धर्माच्या पलीकडे माणसांच्या मूल्यांसाठी लढा दिला. महात्मा ज्योतिराव फुले यांची स्वातंत्र्याची परिभाषा म्हणजे मानसिक गुलामगिरीतून बाहेर पडणे ही होती. आज पुन्हा एकदा स्वातंत्र्याची ही परिभाषा समजून घेणं गरजेचं झालं आहे, त्यामुळे स्वातंत्र्यासंदर्भात महात्मा फुले यांनी मांडलेले विचार आजही कालसुसंगत आहेत. आपण आजचा विचार करतो, पण महापुरुष नेहमी पुढच्या काळाचा विचार करतात. म्हणून आजच्या काळातील संदर्भानुसार महात्मा ज्योतिराव फुले यांचे विचार, कार्य या चित्रपटाच्या माध्यमातून लोकांसमोर आणण्याचा हा प्रयत्न आहे. त्यांना समजून घेताना जातिभेदाच्या पलीकडे जाऊन त्यांनी मांडलेले विचार, उभारलेले कार्य यांचा अभ्यास केला पाहिजे, असे नीलेश यांनी सांगितले. 

Actor Makarand Anaspure Directed movie rajkaran gela mishit marathi movie roles
दिवाळीनंतर मकरंद अनासपुरेंचा नवरंगी धमाका
sneha chavan marathi actress got married for second time
लोकप्रिय मराठी अभिनेत्री दुसऱ्यांदा अडकली लग्नबंधनात; साधेपणाने पार…
Director Nikhil Advani believes that artistic films will never disappear
‘कलात्मक चित्रपट कधीच लोप पावणार नाहीत…’; दिग्दर्शक निखिल अडवाणी
Musical dance drama Urmilayan Aryans Group of Companies Kamesh Modi
सांगीतिक नृत्यनाट्य ‘ऊर्मिलायन’
we the documentary maker Dheeraj akolkar
आम्ही डॉक्युमेण्ट्रीवाले: आनंददायी दृश्य-व्यायाम
Loksatta chaturang Along with sensible profound partner family
इतिश्री: समंजस, प्रगल्भ सोबत
Book Self discovery in space Science
बुकरायण: अंतराळातला आत्मशोध
Loksatta chaturanga Parent Nature Confused Psychologist
सांधा बदलताना : संसार शांतीचा झरा…

‘ प्रत्येकाने महापुरुष आपल्या सोयीनुसार घेतला आहे..’

लोकमान्य टिळकांना आणि महात्मा फुलेंना एकमेकांच्या विरोधात उभं करत इतिहास रंगवून सांगितला जातो, पण प्रत्यक्षात टिळकांना तुरुंगवास भोगावा लागणार होता तेव्हा महात्मा फुले त्यांच्याबरोबर होते. हे वास्तव कधीही सांगितलं जात नाही. कारण लोकमान्य टिळक, बाबासाहेब आंबेडकर किंवा महात्मा फुले असो.. प्रत्येकाने महापुरुष आपल्या सोयीनुसार घेतले आहेत. या  महापुरुषांच्या  कार्याबद्दल मोजकीच माहिती देत आपल्या फायद्यासाठी त्याचा प्रचार केला जात आहे, असेही नीलेश यांनी सांगितले.

या चित्रपटात महात्मा फुलेंची भूमिका साकारणाऱ्या संदीप कुलकर्णी यांनी सुरुवातीला ते ज्योतिबांसारखे दिसू शकतील यावर त्यांचा विश्वासच नव्हता असं सांगितलं. ‘मला जेव्हा नीलेशने महात्मा फुले आणि माझं छायाचित्र एकत्र करून दाखवलं तेव्हा माझ्यामध्ये आत्मविश्वास आला की हो.. मी महात्मा फुलेंचं पात्र साकारू शकतो. त्यांचे जीवनचरित्र सांगणाऱ्या या चित्रपटात खूप काहीतरी मोठं सांगितलं आहे असा अभिनिवेश नाही. एका साध्या-सरळ माणसामध्ये एवढा मोठा बदल कसा होतो आणि समाजाचा विचार करत महात्मा फुले किती मोठं कार्य कसं उभारतात, हे या चित्रपटातून प्रेक्षकांना पाहायला मिळेल. आपल्या आजूबाजूला असे खूप लोक असतात जे तुमच्याआमच्या सारखेच सामान्य असतात, पण एखादा विचार त्यांना पटतो आणि मग त्यानुसार झपाटून ते जे समाजासाठी काम करतात ते खूप महत्त्वाचं असतं, असं संदीप कुलकर्णी यांनी सांगितलं.  

हेही वाचा >>> नाटयरंग : चटपटीत  ‘डबल लाइफ’!

तर हिंदीतील अनुभवानंतर मराठीत पहिल्यांदाच सावित्री बाई फुलेंच्या मध्यवर्ती भूमिकेतून प्रेक्षकांसमोर येणाऱ्या राजश्रीनेही आपल्या व्यक्तिरेखेचा अभ्यास करताना साहित्याचा अधिक आधार घेतल्याचं सांगितलं. ‘सावित्रीबाईंची छायाचित्रं आपल्याकडे उपलब्ध नाहीत, तर त्यांच्याबद्दल वर्णन केलेलं आहे. त्यामुळे माझ्या वाचनातून मला जशा सावित्रीबाई समजल्या, तसंच त्यांच्यावर आधारित साहित्यातून त्यांचं जे वर्णन आहे ते समजून घेत तशा पद्धतीने मी ही व्यक्तिरेखा साकारली आहे. मला जेव्हा या चित्रपटासाठी विचारण्यात आलं तेव्हा सुरुवातीला भीती वाटली होती. आपल्याला त्यांच्याबद्दल सगळया गोष्टी माहिती नसतात, पण मला दिग्दर्शक नीलेश आणि संदीप कुलकर्णी यांनी त्यांच्याबद्दल खूप तपशीलवार माहिती दिली. तेव्हा  आपल्याला त्यांच्याबद्दल किती कमी माहिती आहे हे खऱ्या अर्थाने समजलं. आजचं युग हे आधुनिक, तांत्रिक आहे. पण तरीही सावित्रीबाई फुले आणि ज्योतिबा फुले यांच्याबद्दल लोकांना फार कमी माहिती आहे. मला वाटतं, सावित्रीबाई फुले आणि ज्योतिबा फुले हे फक्त महाराष्ट्राचे नाहीत तर त्यांनी उभारलेलं स्त्री-शिक्षणाचं कार्य, बहुजनांची चळवळ हे संपूर्ण देशासाठी महत्त्वाचं असं कार्य आहे. त्यामुळे ते फक्त महाराष्ट्राचे नाही, तर राष्ट्राचे आहेत आणि हे प्रेक्षकांपर्यंत पोहोचलं पाहिजे’ असं आग्रही मत राजश्रीने व्यक्त केलं.

हेही वाचा >>>  ‘पंचक’ भयाचं भूत घालवणारी गोष्ट

 कलेच्या माध्यमातून तरुणांपर्यंत आपला इतिहास पोहोचला पाहिजे आजचं युग हे आधुनिकीकरणाचं आहे, त्यामुळे आपल्याला या तंत्रज्ञानाचा वापर करून सावित्रीबाई फुले आणि ज्योतिबा फुले यांच्या कार्याबद्दल पुन्हा सर्वांना माहिती दिली गेली पाहिजे. तरुणपिढी ही गोंधळलेली असली तरी खूप हुशार आहे. आपल्या इतिहासाची त्यांच्यासमोर सतत उजळणी केली गेली पाहिजे, पुढील ५ वर्षांनंतर देखील पुन्हा त्यांना याची माहिती देत राहिलं पाहिजे जेणेकरून नव्या पिढीला त्यांच्या कार्याची आणि त्यांनी मांडलेल्या विचारांची आजच्या काळातील गरज लक्षात येईल, असं राजश्रीने सांगितलं. आजची पिढी रीलच्या माध्यमातून ज्ञान प्राप्त करत असेल, तर तशा पद्धतीने का होईना पण आपला इतिहास त्यांच्यापर्यंत पोहोचला पाहिजे, असा मुद्दा तिने मांडला.        – शब्दांकन : श्रुती कदम