Sangeet Manapman Teaser : अभिनेता सुबोध भावेने दिग्दर्शित केलेला ‘संगीत मानापमान’ हा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. हा चित्रपट एक सांगीतिक चित्रपट असून या सिनेमाचा टिझर प्रेक्षकांच्या भेटीस आला आहे. या चित्रपटात सुबोध भावे, सुमित राघवन आणि वैदेही परशुरामी यांच्या मुख्य भूमिका असून या चित्रपटाचा टीझर रोहित शेट्टीच्या ‘सिंघम अगेन’बरोबर चित्रपटागृहात दाखवला जाणार आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

‘संगीत मानापमान’ या चित्रपटाच्या टीझरची सुरुवातच मधुर संगीताने होते. प्रसिद्ध संगीतकार शंकर-एहसान-लॉय यांचं संगीत या सिनेमाला लाभलं आहे. या सिनेमात केवळ संगीतच नाही तर अनेक भव्य सेट्स, पारंपरिक नृत्य, तलवारबाजी यांची विलोभनीय दृश्ये दिसत आहेत. हा सिनेमा प्रेक्षकांना एका ऐतिहासिक कालखंडांत घेऊन जाणार असून यात असणारे राजवाडे, महाल, वेशभूषा प्रेक्षकांना त्या काळाची अनुभूती देतात.

हेही वाचा…२२ व्या मजल्यावर ३ BHK घर! दिवाळीच्या मुहूर्तावर अमृता खानविलकरचं गृहस्वप्न साकार; दाखवली नव्या घराची पहिली झलक

‘संगीत मानापमान’ चित्रपटातील संगीताच्या मेजवानीची एक छोटीशी झलक प्रेक्षकांना टीझरमध्ये बघायला मिळत आहे. या चित्रपटात एकूण १४ गाणी आहेत, तर या गाण्यांना १६ दिग्गज गायकांनी आपला आवाज दिला आहे. यातील सात गायक हे राष्ट्रीय पुरस्कार विजेते गायक आहेत, त्यामुळे चित्रपट पाहण्याचा अनुभव म्हणजे अद्वितीय गायकांनी सजवलेली मैफिल आहे. सुबोध भावे, सुमित राघवन आणि वैदेही परशुरामी यांच्याबरोबर या चित्रपटात उपेंद्र लिमये, निवेदिता सराफ, नीना कुळकर्णी यांच्या महत्त्वाच्या भूमिका आहेत.

सुबोध भावेने चित्रपटाविषयी आपलं मत व्यक्त करताना सांगितले की “मला आनंद होतोय की आज रोहित शेट्टी दिग्दर्शित ‘सिंघम अगेन’सारख्या चित्रपटाबरोबर मराठी परंपरेचा साज राखणारा आणि सुरेल संगीताचा मान ठेवणारा ‘संगीत मानापमान’ चित्रपटाचा टीझर मोठ्या पडद्यावर झळकणार आहे. केवळ मराठी माणूस नव्हे तर महाराष्ट्रात राहणारे इतर तमाम प्रेक्षक आणि विशेषतः सिनेमा लव्हर्स, जे सिनेमागृहात जातील त्यांच्यासाठी नक्कीच मोठ्या पडद्यावर हा टिझर बघणं एक वेगळाच अनुभव असेल.”

हेही वाचा…‘फँड्री’ फेम राजेश्वरी खरातने हळदीचा फोटो शेअर केल्यावर सोमनाथच्या रोमँटिक पोस्टने वेधलं लक्ष

जिओ स्टुडिओज प्रस्तुत, निर्माती ज्योती देशपांडे, श्री गणेश मार्केटिंग निर्मित, सुबोध भावे दिग्दर्शित आणि अभिनित, ‘संगीत मानापमान’ चित्रपट १० जानेवारी २०२५ पासून जवळच्या चित्रपटगृहात प्रदर्शनास सज्ज आहे.

मराठीतील सर्व मराठी सिनेमा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sangeet manapman teaser released subodh bhave vaidehi parashurami and sumeet raghavan star in this upcoming musical psg