Sankarshan Karhade Political Poem : लोकप्रिय अभिनेता संकर्षण कऱ्हाडे उत्तम कवी म्हणून देखील ओळखला जातो. मध्यंतरी त्याची राजकीय कविता तुफान व्हायरल झाली होती. या कवितेची चर्चा संपूर्ण राजकीय वर्तुळात रंगली होती. एवढंच नव्हे तर, त्या कवितेनंतर संकर्षणला मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी शिवतीर्थवर बोलावून त्याची भेट देखील घेतली होती. आता पुन्हा एकदा अभिनेत्याने आपल्या कवितेच्या माध्यमातून सद्य राजकीय परिस्थितीवर भाष्य करत जनसामान्यांना निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मतदान करण्याचं आवाहन केलं आहे. संकर्षणने पांडुरंगाला अनुसरुन, त्यांना साद घालत लिहिलेली ही नवीन राजकीय कविता सोशल मीडियावर चांगलीच व्हायरल होत आहे. ‘स्मृतीगंध मराठी’ या इन्स्टाग्राम पेजवरून हा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा : भावामुळे ओळख, कॅलिफोर्नियात लग्न अन्…; लग्नाला २५ वर्षे पूर्ण होताच माधुरी दीक्षितने सांगितलं सुखी संसाराचं गुपित, म्हणाली…

अभिनेता ( Sankarshan Karhade ) या व्हिडीओमध्ये म्हणतो, “सगळ्यांना माझी नम्र विनंती आहे तुम्ही मोबाइल खिशात ठेवा…कारण, मी आता तुम्हाला काहीतरी नवीन ऐकवण्याचा प्रयत्न करणार आहे. राजकारण आणि पांडुरंग हे दोन्ही माझ्या अत्यंत आवडीचे विषय आहेत. या विषयाला अनुसरून मी काहीतरी लिहिलंय…नीट ऐका.”

संकर्षण कऱ्हाडेची कविता

महाराष्ट्रातली सगळी गावं तुझीच आहेत, तू अर्ज भरून पाहावं
मला वाटतं पांडुरंगा तू यंदा निवडणुकीला उभं राहावं
मग ना पावसातल्या सभा, ना प्रचाराचा घाम
तुझेच स्टार प्रचारक देवा ज्ञानबा- तुकाराम
प्रचाराच्या जाहिरातीत यांच्या ओव्या कानी पडतील
बॅनर पाहून वीट येण्यापेक्षा हात जोडले जातील…
सगळं सुखाचं होईल देवा, विपरीत काहीच घडणार नाही
आणि तू सगळ्यांचा असल्यामुळे एकही मत जात पाहून पडणार नाही
अजून तरी पांडुरंगा तुझा कोणी विरोधक नसल्याने सगळ्यांना बरंच वाटेल
आणि मुख्यमंत्रीपदाचा चेहरा कोण हे कोडं देखील लवकर सुटेल
पहिली टर्म असली तरी देवा बिनविरोध येशील
आणि मुख्य म्हणजे भल्याभल्यांना तुझ्या मंत्रिमंडळात घेशील
सगळ्यात पहिला मोठा निर्णय पांडुरंगा असा घे…
कायद्यासोबत गृहखातं छत्रपती शिवाजी महाराजांना दे!
मग काय टाप कोणाची, कोण कायदा हातात घेईल
अरे एका नजरेत पूर्ण महाराष्ट्र सुतासारखा सरळ होईल
लाडक्या भावांवरचं समान प्रेम जिचा आदर्श म्हणून पाहावं
त्या मुक्ताईकडे महिला व बालविकास खातं जावं
आणि साक्षरतेचे तर विठ्ठला काय दिवस येतील
बुद्धीला वैभव म्हणणारे आमचे ज्ञानदेव शिक्षणमंत्री होतील
अरे पाणी ज्यांच्या गाथेला तारून स्वत: खाली बुडलं जे सदेह आले स्वर्ग आणि तू दार उघडलं
त्या तुकोबांच्या हाती दे पुन्हा हिशेबाच्या वह्या आणि अर्थमंत्री म्हणून घे त्यांच्या ताबडतोब सह्या
एकदम झाला आवाज हो…लखलख वीज कडाडली
वीटेवरची माऊली माझ्यावरती चिडली
काय लावली केव्हापासून तुझी ही बडबड आहे…
हे सगळं होणं आता अशक्य आणि अवघड आहे
या थोरांना मंत्री करून मला CM करतोय होय
राजकारणात यांच्या नावाचा होतोय तेवढा वापर पुरेय
राष्ट्राच्या भल्यासाठी बोलतोय म्हणून केव्हाचा ऐकतोय
पण, ऐक आता एक उपाय मी मन लावून सांगतोय
माऊलीच्या रुपातला विठ्ठल बापासारखा वागला आणि जबाबदारीने राष्ट्रासाठी पुढे बोलू लागला
मला बोलला म्हणाला गाथा, ज्ञानेश्वरी, शिवचरित्र तुम्ही कोणी वाचता?
आणि मग कसं काय तुम्ही जयंती असताना डीजे लावून नाचता
या सगळ्यांना तुम्ही सोयीनुसार जातीमध्ये वाटलंत
डोक्यावरती घेतलं पण, डोक्यात नाही घातलंत.
प्रत्येक तुका-शिवाजी आहेत…जर विचारांचा घेतला वसा
सुराज्यासाठीच काम करावं मग कोणीही खुर्चीत बसा!
आणि कर्तृत्वाची वेळ आहे आता नको नुसती बडबड
आधी मतदानाला वारी समजून तू घराबाहेर पड…
आम्ही सगळे पाठिशी आहोत तुम्ही खुशाल राहा
अरे समोर महाराष्ट्र उभा आहे त्याच्यात पांडुरंग पाहा…

दरम्यान, “अप्रतिम कविता संकर्षण क्या बात है”, “क्या बात है…क्या बात है संकर्षण दादा केवळ कमाल”, “अतिशय सुंदर, अप्रतिम. विठ्ठल तुझं भलं करो…” अशा प्रतिक्रिया नेटकऱ्यांनी संकर्षणची ( Sankarshan Karhade ) कविता ऐकून व्हिडीओवर दिल्या आहेत.

मराठीतील सर्व मराठी सिनेमा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sankarshan karhade political poem about recent political situation and maharashtra election sva 00