अभिनेता संकर्षण कऱ्हाडे हा आपल्या कामाबरोबरच सोशल मीडियाच्या माध्यमांतूनही प्रेक्षकांच्या संपर्कात असतो. आता त्याने शेअर केलेल्या व्हिडीओची चर्चा होताना दिसत आहे. अमेय वाघचा ‘लाइक आणि सबस्क्राइब’ हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. त्यानिमित्ताने संकर्षण कऱ्हाडेने त्याच्याबद्दलची एक आठवण सांगितली आहे.
काय म्हणाला संकर्षण कऱ्हाडे?
संकर्षणने त्याच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर व्हिडीओ शेअर करीत म्हटले, “नमस्कार, माझे नाव संकर्षण कऱ्हाडे. माझा एक मित्र आहे अमेय वाघ. आता ही मैत्री मी मानतो म्हणून आहे बरं का? साहेबांना, माझा मित्र म्हणतो म्हणून ते माझे मित्र आहेत. त्यांना मी किती मित्र वाटतो हा अभ्यासाचा विषय आहे. ते असतं ना की, एखादा माणूस असतो, जो आपल्या बायकोला सांगतो, अगं, मुख्यमंत्री साहेब मला ओळखतात. परवा स्टेजवर मी उभा होतो, आल्या आल्या पहिलं वाक्य माझ्याशी बोलले. बायको म्हणते, काय म्हणाले, चल उतर खाली. तशी आमची मैत्री आहे.”
“मला माझ्या लाडक्या कलाकाराची एक आठवण सांगायची आहे. मी कायम नाटकाच्या शोधात असतो. सुट्टी असली की, मी नाटक पाहतो. एके दिवशी मी जुहूला पृथ्वी थिएटरला गेलो. म्हटलं बघूयात कुठलं नाटक आहे. तिथे दोन नाटकांचे बोर्ड लागले होते. नाटकांची नावं ‘दळण’ आणि ‘गेली एकवीस वर्ष’ अशी होती. या दोन्ही नाटकांत प्रमुख भूमिकेत अमेय वाघ होते. विश्वास ठेवा- जबरदस्त काम केलं होतं. तेव्हापासून मी या कलाकाराला मनापासून लाइक करतो आणि त्याला माझ्या मनात सबस्क्राइब केलं आहे. त्याचा ‘लाईक आणि सबस्क्राइब’ हा चित्रपट १८ ऑक्टोबरला येतोय. या चित्रपटात माझी अजून एक लाडकी मैत्रीण आहे, जी माझी रील फ्रेंड आहे. रिअल लाइफमधली रील फ्रेंड आहे. नाव तिचं अमृता खानविलकर आहे”, असे म्हणत संकर्षणने हा चित्रपट पाहण्याचे आवाहन केले आहे.
दरम्यान, अमृता खानविलकर आणि संकर्षण कऱ्हाडे ‘ड्रामा ज्युनियर्स’ या कार्यक्रमात परीक्षकाच्या भूमिकेत आहेत. अनेकदा ते मजेशील रील बनवीत प्रेक्षकांचे मनोरंजन करीत असतात. याबरोबरच संकर्षण कऱ्हाडे त्याच्या नाटकामुळे आणि कवितांमुळेदेखील मोठ्या चर्चेत असतो.