अभिनेता संकर्षण कऱ्हाडे सध्या एका वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आला आहे. गेली काही वर्षे तो आणि अभिनेत्री स्पृहा जोशी ‘संकर्षण व्हाया स्पृहा’ या कार्यक्रमाद्वारे प्रेक्षकांचं निखळ मनोरंजन करत आहेत. या कार्यक्रमात अभिनेत्याने नुकतीच एक कविता सादर करत सध्याची राजकीय परिस्थिती प्रेक्षकांसमोर मांडली. त्याचा व्हिडीओ अवघ्या काही तासांतच सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

संकर्षणची कविता सर्वत्र चर्चेत आल्यावर काही राजकीय नेत्यांनी त्याला फोन केले. तर, मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी फोन करून त्याला घरी बोलावलं होतं. याचा अनुभव संकर्षणने नुकताच ‘एबीपी माझा’ला दिलेल्या मुलाखतीत सांगितला.

हेही वाचा : मराठी साहित्यातलं मानाचं पान ‘फकिरा’ रुपेरी पडद्यावर

संकर्षण म्हणाला, “खरं सांगायचं झालं, गेल्या दोन दिवसांत माझा फोन खूप श्रीमंत झालाय. कारण, ही मोठी माणसं खरंच खूप मोठी असतात आपण उगाच एकमेकांचे हेवेदावे करून चिखल करून घेतो. मला गेल्या दोन दिवसांत राज ठाकरे साहेबांचा, उद्धव ठाकरे साहेबांचा, विनोद तावडे साहेबांचा फोन येऊन गेला. सगळ्यांचे फोन येत आहेत. यांचे आवाज मी स्वत:च्या कानांनी ऐकले. शरद पवार साहेब माझ्याशी स्वत: नाही बोलले पण, त्यांच्या एका निकटवर्तीयाचा मला फोन आला होता. त्यांनी मला सांगितलं मी तुमच्या सगळ्या कविता साहेबांना ऐकवतो. ही कविता सुद्धा मी त्यांना पाठवली आहे. त्यांनाही ती आवडली. या निवडणुका झाल्यावर तुम्ही एकदा या त्यांना तासभर सगळ्या कविता ऐकवा.”

हेही वाचा : स्वरगंधर्वाचा चरित्रपट

अभिनेता पुढे म्हणाला, “विनोद तावडे साहेबांनी फोन केला, त्यांच्या पत्नीने मला कौतुकाचा मेसेज केला होता. राज ठाकरेंनी मला फोन करून भेटायला घरी बोलावलं. त्यांनी अकरा वाजता ये असं सांगितलं. मी सकाळी साडेसात वाजता मिरारोडवरून निघालो. मी बरोबर नऊ वाजता शिवाजी पार्क परिसरात पोहोचलो आणि ११ च्या आधी मी तिथेच फेऱ्या मारत होतो. मी त्यांच्या घरात गेलो आणि आमच्या घरच्या ग्रुपवर मेसेज टाकला मी आत येऊन बसलोय. तेव्हापासून आमचे बाबा सारखे बीपीच चेक करत होते. हे सगळं मी राज साहेबांना जाऊन सांगितलं. ते खूपच मिश्किल आहेत त्यामुळे मी जेव्हा त्यांच्या घरून निघालो तेव्हा ते सुद्धा म्हणाले, ‘घरच्यांना सांगा सुखरुप निघालोय.”

हेही वाचा : Video: रणबीर-आलियाच्या लेकीच्या ‘या’ व्हिडीओनं सगळ्यांचं वेधलं लक्ष, पाहा राहा कपूरचा क्यूट अंदाज

“त्यांच्या राज ठाकरे होते, त्यांच्या पत्नी होत्या. बरं या चर्चेत कुठेही तू असं का लिहिलं, तसं का लिहिलं यापैकी त्यांनी काहीच विचारलं नाही. त्यांनी खूप मनमोकळा संवाद साधला. तुझं काय चालूये, नाटक कसं सुरु आहे, कुठे राहतोस, घरी कोण कोण असतं, सिनेमा, भारत, महाराष्ट्र अशी सगळी चर्चा त्यांनी माझ्याशी आनंदाने केली. काल मला उद्धव ठाकरे साहेबांचा फोन आला होता. फार उत्कृष्ट कविता झालीये असं ते देखील म्हणाले. मी त्यांना विचारलं तुम्ही रागावलात का? तर ते म्हणाले, अजिबात नाही…आजच्या काळात असं खरं खरं लिहिणारं कोणीतरी पाहिजे ना…जेणेकरून आमच्यासमोर सुद्धा वस्तुस्थिती पोहोचते. इथून पुढे सुद्धा असंच छान छान लिहित राहा. याशिवाय आशिष शेलार सुद्धा लवकरच कार्यक्रम पाहायला येणार आहेत असं त्यांनी आमच्या निर्मात्यांना सांगितलंय” असं संकर्षण कऱ्हाडेने स्पष्ट केलं.

मराठीतील सर्व मराठी सिनेमा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sankarshan karhade share experience to visit raj thackeray home after politics poem become viral sva 00