Sankarshan Karhade Post : मराठी नाटक, मालिका, चित्रपट अशा तिन्ही माध्यमांध्ये संकर्षण कऱ्हाडेने आपला ठसा उमटवला आहे. विविधांगी भूमिका साकारून तो नेहमीच प्रेक्षकांचं मनोरंजन करत असतो. संकर्षण उत्तम अभिनेता आहेच पण, याचबरोबर तो खूप चांगला कवी देखील आहे. याशिवाय अनेक कार्यक्रमांच्या सूत्रसंचालनाची जबाबादारी सुद्धा त्याने सांभाळली आहे.
अभिनेता सध्या रंगभूमीवर सक्रियपणे काम करतोय. त्याचा आणि स्पृहा जोशीचा ‘संकर्षण व्हाया स्पृहा’ हा कार्यक्रम चाहत्यांमध्ये प्रचंड लोकप्रिय आहे. या कार्यक्रमाच्या प्रयोगांमध्येच संकर्षणने राजकीय तसेच सामाजिक विषयांवर भाष्य करणाऱ्या नवनवीन कविता सादर केल्या आहेत. हा कार्यक्रम ८ जानेवारीला सांगली येथे पार पडणार आहे. या कार्यक्रमाचे आतापर्यंत विविध भागांमध्ये प्रयोग झाले आहेत.
नुकताच अभिनेता ‘संकर्षण व्हाया स्पृहा’ या कार्यक्रमाच्या निमित्ताने पश्चिम महाराष्ट्रात पोहोचला आहे. यावेळी संकर्षणने सर्वात आधी तेथील जेवणावर ताव मारला. याबद्दलची खास पोस्ट अभिनेत्याने शेअर केली आहे.
संकर्षण कऱ्हाडेची पोस्ट
क्या बात है… पश्चिम महाराष्ट्राच्या हद्दीत आलो की नाही… डोकंच काम करणं बंद होतंय बघा…! असला वाद खुळा जेवलोय कराडमध्ये… ज्वारीची अन् बाजरीची भाकरी, भरलं वांगं, अख्खा मसूर, शेवभाजी… सगळ्यात शेटवी मऊ मऊ इंद्रायणी भात… हे सगळं तुमच्याशी शेअर केलं केल्यावर जास्त पोट भरतंय बघा… बाकी बरंय नव्हं…???
आणि हो, या गाण्याचा आन् फोटूचा काहीच संबंध नाहीये… पण जेवताना हेच गाणं लावलं हूतं तिथल्या पोरानं…
दरम्यान, संकर्षण कऱ्हाडेच्या पोस्टवर नेटकऱ्यांनी “नाद खुळा जेवलात की, वाद खुळा”, “कऱ्हाडे at कराड छान यमक जुळतं”, “कराड म्हटलं म्हणजे विषयच संपला”, “आ हा हा काय बेत आहे”, “ज्वारीची भाकरी आणि वांग्याचं भरीत म्हणजे सुख” अशा भन्नाट कमेंट्स केल्या आहेत. याशिवाय अभिनेत्याच्या कामाबद्दल सांगायचं, तर येत्या १५ ते १७ जानेवारी या तीन दिवसात छत्रपती संभाजीनगरमध्ये संकर्षण कऱ्हाडे नाट्य महोत्सव पार पडणार आहे. या महोत्सवाला मराठवाड्याच्या प्रेक्षकांनी आवर्जून उपस्थिती लावावी असं आवाहन अभिनेत्याने केलं आहे.
© IE Online Media Services (P) Ltd