नाटक, मालिका, चित्रपटाच्या माध्यमातून मराठी इंडस्ट्रीत स्वतःची वेगळी ओळख निर्माण करणारा संकर्षण कऱ्हाडे सध्या चांगलाच चर्चेत आला आहे. कारण ‘संकर्षण व्हाया स्पृहा’ या कार्यक्रमात त्याने सादर केलेली राजकीय परिस्थितीवरील कवितेचा व्हिडीओ प्रचंड व्हायरल झाला आहे. ‘लोकशाही जिवंत ठेवा’ या कवितेतून अभिनेत्याने कुठल्याही पक्षाचा किंवा नेत्याचा उल्लेख न करता राजकारणावर चपखल भाष्य केलं आहे. यावरून सध्या संकर्षणचं कौतुक होतं आहे. पण संकर्षणला ही कविता कशी सुचली? त्याला ही कविता लिहिण्यासाठी किती दिवस लागले? नेमकी या कवितेमागची गोष्ट काय आहे? जाणून घ्या…
अभिनेता संकर्षण कऱ्हाडेनं ‘लोकशाही जिवंत ठेवा’ कविता पहिल्यांदा ‘संकर्षण व्हाया स्पृहा’च्या नाशिकच्या प्रयोगात सादर केली होती. त्यानंतर ठाण्याच्या प्रयोगात सादर केली. ही कविता सादर केल्यानंतर प्रेक्षकांनी दोन-अडीच मिनिटं टाळ्यांचा कडकडाट करून प्रतिसाद दिला होता. एवढंच नव्हेतर त्या कवितेची दखल सर्व पक्षांच्या आजी-माजी ज्येष्ठ-कनिष्ठ नेत्यांनी घेतली. फोन करून सोशल मीडियाद्वारे संकर्षणचं कौतुक केलं.
‘महाराष्ट्र टाइम्सशी’ बातचित करताना संकर्षण कऱ्हाडेनं ‘लोकशाही जिवंत ठेवा’ कवितेमागची गोष्ट सांगितली. तो म्हणाला सांगितलं, “मतदानाच्या तारखा जाहीर झाल्या आणि डोक्यात आपोआपच पक्ष, निवडणुका, मतदान, लोकशाही यांचा एकंदरीत विचार घोळू लागला. मागील काही दिवसांपासून वेगवेगळ्या पद्धतीने लोकशाहीबद्दचे विचार मनात येत होते. गेले दहा-पंधरा दिवस काम झालं की, रोज रात्री याबद्दल लिहायचा प्रयत्न करत होतो. पण मनासारखी भट्टी जमून येत नव्हती.”
हेही वाचा – ‘जुनं फर्निचर’ चित्रपटात सलमान खान झळकणार होता ‘या’ भूमिकेत, महेश मांजरेकर खुलासा करत म्हणाले, “त्याला…”
पुढे संकर्षण म्हणाला, “कोणत्याही नेत्यांची नावं न घेता आणि अमुक एका पक्षावर लक्ष्य न करता कविता करायची होती. मग विचार आला की, एखाद्या घरात वेगवेगळ्या पक्षांना पाठिंबा देणारे कसा विचार करत असतील. सध्याची राजकीय स्थिती बघून त्यांना काय वाटत असेल? या सगळ्यांचा एकंदरीत विचार कवितेतून यायला हवा. शिवाय कवितेत राजकीय संदर्भ देताना कोणाच्याही भावना दुखवायच्या नव्हता. १० ते १५ दिवसांच्या प्रयत्नांनंतर साधारण आठवड्याभरापूर्वी ‘लोकशाही जिवंत ठेवा’ ही कविता जमून आली.”