महाराष्ट्राच्या आध्यात्मिक पायाभरणीत वारकरी संप्रदायाचा महत्त्वाचा वाटा आहे. वारकरी संप्रदायात संत निवृत्तीनाथ, संत ज्ञानदेव, संत सोपानकाका, संत मुक्ताबाई यांना विरक्ती, ज्ञान, भक्ती आणि मुक्ती यांचे मूर्तिमंत स्वरूप मानले जाते. आई-वडिलांनंतर कुटुंब सांभाळण्याची नाजूक जबाबदारी मुक्ताबाईंवर पडली. आपल्या भावंडांची जणू ती माऊलीच झाली. मुक्ताबाईंचे साधेपण अर्थपूर्ण विचार आपल्याला आजही विचार करायला भाग पाडतात आणि स्त्री मुक्तीची वेगळीच जाणीव निर्माण करत प्रेरणाही देतात.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

अशा संत मुक्ताबाईंचे आणि त्यांच्या कुटुंबाचे प्रेरणादायी चरित्र उलगडून दाखवणारा दिग्दर्शक दिग्पाल लांजेकर दिग्दर्शित ‘संत ज्ञानेश्वरांची मुक्ताई’ हा भव्य मराठी चित्रपट २ ऑगस्टला आपल्या भेटीला येत आहे. याची पहिली झलक नुकतीच सोशल मीडियावर शेअर करण्यात आली आहे.

हेही वाचा : भव्य क्रूझ, अमेरिकन बँडचा परफॉर्मन्स अन्…; अनंत-राधिकाच्या प्री-वेडिंगचे फोटो व्हायरल, रणवीरच्या हटके लूकने वेधलं लक्ष

‘संत ज्ञानेश्वरांची मुक्ताई’ या चित्रपटाची घोषणा झाल्यापासून अलौकिक भावंडांच्या भूमिकेत नेमकं कोण असणार? याविषयीची उत्सुकता शिगेला पोहोचली होती. नुकत्याच प्रदर्शित झालेल्या एका पोस्टरमधून लहानपणीच्या ‘मुक्ताई’ आणि ‘ज्ञानेश्वर’ यांची झलक पहायला मिळते आहे. प्रदर्शित झालेल्या पोस्टर मध्ये आपल्याला संत ज्ञानेश्वरांच्या भूमिकेत मानस बेडेकर आणि मुक्ताच्या भूमिकेत चिमुकली ईश्मिता जोशी दिसत आहे.

मुक्ताई आणि ज्ञानेश्वर यांचं नातं विलक्षण होतं. मुक्ताई ज्ञानेश्वरांची कधी माता बनायची, कधी बहीण, तर कधी शिष्या बनायची. ज्ञानेश्वरांना गुरु मानून मुक्ताईने त्यांच्याकडून ज्ञान आत्मसात केले, तर प्रसंगी तिने ज्ञानेश्वरांना उपदेशही केला. संत मुक्ताईच्या मुक्तपणाचे व श्रेष्ठपणाचे संतश्रेष्ठींनी ‘मुक्तपणे मुक्त, श्रेष्ठपणे श्रेष्ठ, सर्वत्रा वरिष्ठ आदिशक्ती मुक्ताई।।’ असे वर्णन केले आहे.

हेही वाचा : थिएटर्समध्ये सुपरफ्लॉप ठरलेला ‘बडे मियाँ छोटे मियाँ’ OTT वर होणार प्रदर्शित, अक्षय कुमार-टायगर श्रॉफचा सिनेमा कुठे पाहता येणार?

मुक्ताईचे छोटेसे जीवन अत्यंत तेजोमय, प्रखर ज्ञानचेतनेचे सिद्ध जीवन होते. छोट्या आयुष्यात या जगन्मायेने संत कवयित्रींच्या काव्यानुभवांचा पाया रचला. स्त्रियांना अध्यात्माचे क्षेत्र खुले करून देऊन त्यात स्त्री-कर्तृत्वाचा आदर्श उभा केला.‘मुक्ताई’ने निभावलेल्या माता ,भगिनी, गुरु अशा विविध भूमिकांचे पदर ‘संत ज्ञानेश्वरांची मुक्ताई’ चित्रपटातून उलगडणार आहेत.

चित्रपटात समीर धर्माधिकारी, मृणाल कुलकर्णी, अजय पुरकर, मनोज जोशी, स्मिता शेवाळे, सचिन देशपांडे, अभिजीत श्वेतचंद्र, आदिनाथ कोठारे, अश्विनी महांगडे असे एकापेक्षा एक दमदार कलाकार आहेत. येत्या २ ऑगस्टला हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.

मराठीतील सर्व मराठी सिनेमा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sant dnyaneshwaranchi muktaai movie will release on 2nd august here is the first look sva 00