मराठीसह बॉलीवूडमध्ये आपला ठसा उमटवणारे प्रसिद्ध दिग्दर्शक समीर विद्वांस नुकतेच लग्नबंधनात अडकले आहेत. त्यांच्या विवाहसोहळ्यातील खास फोटो दिग्दर्शक हेमंत ढोमेने इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत. गेल्या अनेक दिवसांपासून समीर विद्वांस यांची लगीनघाई सुरू असल्याचं पाहायला मिळत होतं. अखेर या दिग्दर्शकाच्या लग्नातील पहिला फोटो चाहत्यांसमोर आला आहे. मराठी कलाविश्वातील अनेक कलाकारांनी त्यांच्या लग्नाला उपस्थिती लावली होती.

दिग्दर्शक समीर विद्वांस यांचं काही दिवसांपूर्वीच सगळ्या मराठी कलाकारांनी मिळून केळवण केलं होतं. या केळवणाला हेमंत ढोमे – क्षिती जोग, चिन्मय मांडलेकर व त्याची पत्नी नेहा, लोकेश गुप्ते असे सगळे कलाकार उपस्थित होते. यानंतर शुक्रवारी ( २८ जून ) दिग्दर्शकाच्या हळदी समारंभाचे फोटो सर्वत्र व्हायरल झाले होते. केळवण, हळद, मेहंदी असे लग्नापूर्वीचे सगळे विधी केल्यावर आता समीर व जुईली लग्नाच्या बेडीत अडकले आहेत. त्यांच्या लग्नसोहळ्यातील सुंदर असा फोटो अभिनेता हेमंत ढोमेने सोशल मीडियावर शेअर केला आहे.

हेही वाचा : पूर्णा आजीने प्रियाला लगावली कानशिलात! ‘ठरलं तर मग’ मालिकेत मोठा ट्विस्ट, ‘या’ दिवशी असणार विशेष भाग

समीर विद्वांस आणि जुईली सोनलकर यांचा साखरपुडा फेब्रुवारी महिन्यात पार पडला होता. तेव्हापासून या जोडप्याच्या लग्नाबद्दल सगळ्यांच्या मनात उत्सुकता निर्माण झाली होती. अखेर यांच्या लग्नातील पहिला फोटो आता समोर आला आहे. यामध्ये जुईली यांनी हिरव्या रंगाची सुंदर अशी साडी, त्यावर लाल रंगाची शाल, केसात गजरा, हातात हिरवा चुडा असा लूक केला होता. तर, दिग्दर्शकाने आयव्हरी रंगाचा कुर्ता घातला होता. दोघेही या फोटोमध्ये अतिशय सुंदर दिसत आहेत.

“आयुष्यभर असेच एकत्र राहा…तुम्हाला वैवाहिक आयुष्यासाठी खूप खूप शुभेच्छा” असं कॅप्शन देत हेमंत ढोमेने समीर विद्वांस यांच्या लग्नाची पहिली झलक सोशल मीडियावर शेअर केली आहे.

हेही वाचा : सिनेमा फ्लॉप झाल्याने बुडाले पैसे, बॉलीवूड अभिनेता कोट्यवधींचं कर्ज फेडण्यासाठी सर्कसमध्ये झाला सामील; तीन महिन्यात…

समीर विद्वांस आणि जुईली सोनलकर यांचा साखरपुडा फेब्रुवारी महिन्यात ‘व्हॅलेंटाईन डे’ला झाला होता. गुपचूप साखरपुडा उरकत दिग्दर्शकाने त्याच्या सर्व चाहत्यांना सुखद धक्का दिला होता. जुईली आणि समीर यांनी २०१७ मध्ये ‘मला काही प्रॉब्लेम नाही’ या मराठी चित्रपटासाठी पहिल्यांदाच एकत्र काम केलं होतं.

समीर विद्वांस अडकले विवाहबंधनात

दरम्यान, समीर विद्वांस उत्तम दिग्दर्शक आहेतच पण, त्यांच्या कामाबद्दल सांगायचं झालं, तर ते उत्तम अभिनेते आणि लेखकही आहेत. ‘धुरळा’, ‘टाइम प्लीज’, ‘डबल सीट’, ‘आनंदी गोपाळ’ ते बॉलीवूडचा ‘सत्यप्रेम की कथा’ या चित्रपटांमध्ये समीर यांनी दिग्दर्शनाची जबाबदारी सांभाळली होती.