महात्मा ज्योतिबा फुले आणि क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जीवनावर आधारित सत्यशोधक हा चित्रपट गेल्या ५ जानेवारी रोजी प्रदर्शित झाला. या चित्रपटाला प्रेक्षकांकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे. फुले दाम्पत्याचे विचार जाणून घेण्यासाठी, त्यांचा जीवनप्रवास पाहण्यासाठी अनेकजण चित्रपटगृहांबाहेर गर्दी करताना दिसले. प्रेक्षकांनी या चित्रपटाला चांगला प्रतिसाद दिला.
नीलेश जळमकर लिखित, दिग्दर्शित ‘सत्यशोधक’ चित्रपटात अभिनेता संदीप कुलकर्णी याने महात्मा ज्योतिबा फुले यांची भूमिका साकारली आहे. तर राजश्री देशपांडे सावित्रीबाई फुलेंच्या भूमिकेत आहे. यासह रवींद्र मंकणी, अमोल बावडेकर, अनिकेत केळकर, गणेश यादव, सिद्धेश झाडबुके.यांच्याही या चित्रपटात महत्त्वाच्या भूमिका आहेत.
आणखी वाचा : “याची तुलना हॉलिवूडशी…” तापसी पन्नूचं ‘अॅनिमल’ चित्रपटाबद्दलचं वक्तव्य चर्चेत
संपूर्ण महाराष्ट्रातून या चित्रपटाला उदंड प्रतिसाद मिळत आहे अन् अशातच याच्या निर्मात्याने एक नवी बातमी प्रेक्षकांबरोबर शेअर केली आहे. चित्रपटाच्या टीमने सोशल मीडियाच्या माध्यमातून एक चांगली बातमी शेअर केली आहे. येत्या फेब्रुवारी महिन्यात चक्क न्यूझीलंडमध्ये ‘सत्यशोधक’ चित्रपटाचा प्रीमियर होणार असल्याचं या पोस्टमध्ये स्पष्ट करण्यात आलं आहे. न्यूझीलंडची राजधानी वेलिंग्टन येथे हा खास शो आयोजित करण्यात आला आहे.
याबरोबरच न्यूझीलंडचे राजदूत तसेच तिथले काही हॉलिवूड स्टार्सदेखील या प्रीमियरला हजेरी लावणार आहेत. मराठी चित्रपटांच्या बाबतीत ही घटना प्रथमच घडली आहे. यामुळेच ही पोस्ट वाचून कित्येकांचे उर अभिमानाने भरून आलं आहे. नुकतंच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ‘सत्यशोधक’ हा चित्रपट टॅक्स फ्री केल्याची घोषणाही केली. त्यांच्या या कृतीमुळे राज्याच्या कानाकोपऱ्यापर्यंत फुले दाम्पत्याचे विचार व कार्य पोहोचेल यात काहीच शंका नाही.
या चित्रपटाची पटकथा लिहिण्यासाठी राज्य शासनाच्या विविध पुस्तकांचा संदर्भ घेण्यात आला आहे तसेच त्यांचा गाढा अभ्यासही करण्यात आला असल्याचं चित्रपट पाहताना स्पष्ट होतं. महात्मा जोतीराव फुले यांच्या कार्याचे अभ्यासक व प्रसिद्ध साहित्यिक प्राध्यापक हरी नरके यांच्या मार्गदर्शनाखाली हा चित्रपट तयार झाला असल्याचं स्पष्ट झालं आहे.