Anant Ambani Wedding: देशातील श्रीमंत उद्योगपती मुकेश अंबानींचा मुलगा अनंत अंबानी अखेर लग्नबंधनात अडकला आहे. १२ जुलैला अनंत अंबानीचं लग्न राधिका मर्चंट हिच्याशी झालं. एन्कोर हेल्थकेअर प्रायव्हेट लिमिटेडचे सीईओ वीरेन मर्चंट आणि उद्योजिक शैला मर्चंट यांची लाडकी मुलगी राधिका आता अंबानींची धाकटी सून झाली आहे. सध्या अनंत-राधिकाच्या लग्नाची चर्चा चहूबाजूने होतं आहे. सोशल मीडियावर दोघांच्या लग्नाच्या फोटो आणि व्हिडीओंनी धुमाकूळ घातला आहे. अशातच एका मराठी अभिनेत्याने अनंत अंबानी-राधिका मर्चंटच्या लग्नसोहळ्यावर मार्मिक पोस्ट लिहिली आहे.
अनंत अंबानी-राधिका मर्चंटच्या लग्नसोहळ्यावर मार्मिक पोस्ट करणारा मराठी अभिनेता दुसरा-तिसरा कोणी नसून सौरभ गोखले (Saurabh Gokhale) आहे. अभिनेता सौरभ गोखलेने याआधी अनंत अंबानी-राधिका मर्चंट संगीत सोहळ्याची खिल्ली उडवणारी पोस्ट केली होती. सौरभची ही पोस्ट सोशल मीडियावर चांगलाची व्हायरल झाली होती. “एका धनाढ्य कुटुंबातील लग्न समारंभातील नृत्यविष्कार पाहून मला माझ्या छोट्या नुमवि शाळेतील स्नेहसंमेलनातील आमचा नाच आठवला…फरक इतकाच की आम्ही ‘विद्यार्थी’ होतो आणि त्यांना ‘अर्थ-विद्या’ उत्तम येते!” अशी खिल्ली उडवणारी पोस्ट सौरभने लिहिली होती. त्यानंतर आता लग्नसोहळ्यावरही सौरभने मार्मिक पोस्ट लिहिली आहे.
सौरभ गोखलेची मार्मिक पोस्ट वाचा
अभिनेता सौरभ गोखलेने लिहिलं आहे, “येत्या गणेशोत्सवाच्या आराशीसाठी (आरस) नुकत्याच उरकलेल्या लग्नसमारंभातील सेट/कपडे इत्यादी भाड्याने किंवा विकत मिळतील… संपर्क: पेडर रोडला येऊन एक हाक मारा…जय गनेस.” सौरभच्या या पोस्टने पुन्हा एकदा सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे.
दरम्यान, ‘राधा ही बावरी’, ‘उंच माझा झोका’ या ‘झी मराठी वाहिनी’वरील मालिकांमधून घराघरात पोहोचलेल्या सौरभ गोखलेच्या कामाबद्दल बोलायचं झालं तर, त्यानं मराठी मालिकांसह अनेक चित्रपटांमध्ये विविधांगी भूमिका निभावल्या होत्या. एवढंच नव्हेतर त्यानं आपल्या अभिनयाची छाप हिंदी सिनेसृष्टीतही उमटवली आहे. तसंच सौरभ मराठी रंगभूमीवरही अविरत काम करत आहे.
सध्या सौरभचं प्रदीप दळवी लिखित व विवेक आपटे पुनदिग्दर्शित ‘मी नथुराम गोडसे बोलतोय’ नाटक रंगभूमीवर सुरू आहे. या नाटकात त्यानं मुख्य नथुराम गोडसेची भूमिका साकारली आहे. यात सौरभसह आकाश भडसवाळे, चिन्मय पाटसकर, अमित जांभेकर, सुजित देशपांडे, तेजस बर्वे, स्वप्नील कुलकर्णी, गौरव निमकर हे कलाकार महत्त्वाच्या भूमिकेत झळकले आहेत.