Savita Malpekar : विविधांगी भूमिका साकारून प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवणाऱ्या लोकप्रिय अभिनेत्री म्हणून सविता मालपेकरांना ओळखलं जातं. आजवर त्यांनी अनेक गाजलेल्या मालिकांमध्ये महत्त्वाच्या भूमिका साकारल्या आहेत. तसेच ‘मुळशी पॅटर्न’, ‘पांडू’, ‘काकस्पर्श’ अशा गाजलेल्या चित्रपटांमध्ये देखील त्यांनी काम केलं आहे. नुकतीच सविता मालपेकरांनी ‘लोकमत फिल्मी’ला मुलाखत दिली. यावेळी त्यांनी ‘काकस्पर्श’ चित्रपटातली भूमिका कशी मिळाली याबद्दलचा अनुभव सांगितला आहे.
‘काकस्पर्श’मध्ये सविता मालपेकरांनी ( Savita Malpekar ) आत्याबाईंची भूमिका साकारली होती. या पात्रासाठी त्यांनी चित्रपटात टक्कल केल्याचं पाहायला मिळतं. साधारणत: महिला कलाकार यासाठी तयार होत नाही. त्यामुळे ही भूमिका स्वीकारण्यामागचं कारण स्वत: सविता मालपेकरांनी या मुलाखतीत सांगितलं आहे.
हेही वाचा : ८ वर्षांचं प्रेम, कुटुंबियांचा विरोध अन्…; ‘ही’ लोकप्रिय मुस्लीम अभिनेत्री ‘या’ दिवशी करणार आंतरधर्मीय लग्न
आयुष्यात फक्त महेशकडे काम मागितलं – सविता मालपेकर
सविता मालपेकर ( Savita Malpekar ) म्हणाल्या, “मी कधीच कोणाकडे काम मागितलं नाही. फक्त महेश मांजरेकरांकडे मी काम मागितलं. अमेय खोपकरने त्यावेळी माहिमला कोळी महोत्सव भरवला होता. मी, माझी मुलगी, नात असे आम्ही सगळे तिथे गेलो होतो. त्यावेळी माझी महेश-मेधा यांच्याशी भेट झाली. आधी मी त्याच्या सिनेमात छोटं काम केलं होतं. काय माहिती नाही का असं झालं…पण, पटकन मी त्याचा हात धरला आणि म्हटलं…महेश तुझ्याकडे मला खूप चांगलं काम करायचं आहे रे…तर त्याने असं माझ्याकडे पाहिलं आणि मला म्हणाला, टक्कल करशील? मी लगेच हो म्हटलं.”
सविता मालपेकर पुढे म्हणाल्या, “माझं लगेच ‘हो’ असं उत्तर होतं आणि मी याच विश्वासावर पुढे टक्कल केलंय. कारण, एवढा मोठा निर्माता-कलाकार जेव्हा एखाद्या स्त्री कलाकाराला केशवपन करशील का असं विचारतो याचाच अर्थ त्या भूमिकेत काहीतरी खास असणारच! महेशचा माझ्यावर असणारा विश्वास हा मला तेव्हा खूप मोठा वाटला. नाहीतर असं कोणीच कोणाला विचारणार नाही. आपण जे म्हणतो की, नेहमी सकारात्मक असावं…मी म्हणेन काकस्पर्श सारखी भूमिका करण्यासाठी मी ३२ वर्ष वाट पाहिली. पण, माझं मन मला सांगत होतं…की त्या प्रकारची भूमिका नक्की माझ्या वाट्याला येईल.”
हेही वाचा : गावी गेल्यावर १ तास थांबले, अनफॉलो केलं अन्..; सूरजच्या गावी अंकिताला काय खटकलं? सांगितला संपूर्ण घटनाक्रम
“सिनेमे पाहून मला नेहमी वाटायचं अरे आपल्याला पण असं काहीतरी वेगळं करायला मिळालं पाहिजे. पण, ती भूमिका मला महेशच्या निमित्ताने करायला मिळाली.” असं त्यांनी ( Savita Malpekar ) सांगितलं.
© IE Online Media Services (P) Ltd