गेल्या कित्येक वर्षांपासून ज्येष्ठ अभिनेत्री सविता मालपेकर आपल्या दमदार अभिनयाने प्रेक्षकांचं मनोरंजन करत आहेत. नाटक, मालिका, चित्रपट या तिन्ही माध्यमांमध्ये सविता मालपेकरांनी समर्थ अभिनयाचा ठसा उमटवला आहे. ज्याप्रमाणे त्यांनी रंगभूमी गाजवली, त्याप्रमाणे मोठा आणि छोटा पडदा देखील गाजवत आहेत. सध्या त्या ‘स्टार प्रवाह’च्या ‘कुन्या राजाची गं तू रानी’ या मालिकेत पाहायला मिळत आहे. काही दिवसांपूर्वी सविता मालपेकर यांनी ‘अमृता फिल्म’ या युट्यूब चॅनेलला मुलाखत दिली. यावेळी त्यांनी मनोरंजनसृष्टीतील सुरुवात आणि त्यांना कशाप्रकारे अनेकांनी त्रास दिला याविषयी सांगितलं.
या मुलाखतीमध्ये अभिनेत्री सविता मालपेकर यांना विचारलं की, तुम्हाला नृत्याची इतकी आवड होती. मग तुम्ही लावणी नृत्य कुठल्या सिनेमात केलं का नाही? याविषयी बोलताना सविता मालपेकर म्हणाल्या, “मला सेकंड लीड म्हणून एका सिनेमात काम मिळालं होतं. आज ती कलाकार गेली बिचारी रंजना. कुठल्याच कलाकाराच्याबाबतीत असं घडू नये आणि कुठल्या कलाकारांनी असं वागू पण नये, मी म्हणणे. छगन भुजबळांचा पहिला सिनेमा होता. कुलदीप पवार आणि मी, अशोक आणि रंजना अशी जोडी होती. तेव्हा रंजना टॉपला होती. या चित्रपटासाठी माझी सगळी तयारी झाली होती. आता मला डान्स करायला मिळणार, अशी मनस्थिती झाली होती. कुलदीपने म्हणजे त्यावेळेचे विनायक सरस्वती जे भारतमाताचे हे होते. तिथे जाऊन करारवर सही केली होती. चित्रपटासाठी कपडे शिऊन झाले. चार दिवसांतच शूटिंगला जायचं होतं. पण अचानक माझी भूमिकाचं गायब झाली होती. माझ्या जागी दुसरी अभिनेत्री आली होती. “
हेही वाचा – सविता मालपेकरांनी पहिल्यांदा दारुच्या ग्लासला हात लावला अन् त्यांना पाहून अशोक सराफ म्हणालेले…
‘तू रंजनाताईंचा उल्लेख केलास. त्यांच्यामुळे भूमिका गेली का?’ याच उत्तर देत सविता मालपेकर म्हणाल्या, “हो. मला जे कळलं ते असंच होतं. आता खरं खोटं स्वामींना माहित आणि बाप्पाला माहित. पण त्यावेळेला माझ्या कानावर हेच आलं होतं. कारण जे असिस्टंट होते, सिनेमाचे प्रोडक्शन बघणारे होते, त्यांनी जुहूला कुठलंतरी डान्सचं हॉटेल आहे जे मला आता आठवत नाहीये. तिथे जाऊन मला डान्स करायला लावला होता. मला नाचता येत की नाही, हे बघितलं होतं. हे सगळं बघितल्यानंतर, करारावर सही झाल्यानंतर कलाकार कसा काय बदलू शकतो सांगा. म्हणजे डान्सच्या बाबतीत तर कमी नव्हते, अभिनयाच्या बाबतीत थोडं फार कमी असेन. कारण नुकतीच मी आले होते,” असा किस्सा सांगत सविता मालपेकर पुढे त्यांना कामं मिळून नये म्हणून कसे अनेकांनी प्रयत्न केले याविषयी बोलल्या.