अभिनेते सयाजी शिंदे यांनी मराठीसह दाक्षिणात्य चित्रपटांमध्ये उत्तमोत्तम काम केलं. सयाजी यांच्या चित्रपटांमधील भूमिकांवर प्रेक्षकांनी भरभरून प्रेम केलं. सामाजिक कार्यक्रमांमध्ये सयाजी यांचा अधिक सहभाग असतो. वृक्षारोपण करणं हा त्यांचा मुख्य उद्देश. नुकतंच सयाजी यांनी शिरुर तालुक्यातील वृक्षारोपण कार्यक्रमाला हजेरी लावली होती. यादरम्यान त्यांनी वृक्षरोपणाबाबत असणाऱ्या प्रेमाविषयी भाष्य केलं.
आणखी वाचा – Video : राणादा-पाठकबाईंच्या लग्नाची क्रेझ काही संपेना, नवऱ्यासाठी गायलं रोमँटिक गाणं, हार्दिकही भारावला अन्…
सयाजी घोषणाबाजी देत म्हणाले, “चांगलभलं म्हणण्यासारखी माणसं आता राहिली नाहीत. आपल्या देशाचा जो राष्ट्रीय वृक्ष आहे त्याच्या नावाने घोषणा दिलेली बरी. वडाच्या नावानं चांगभलं. आंब्याच्या नावाने चांगभलं. पण आता यापुढे एकच घोषणा लक्षात ठेवा ती म्हणजे, अरे येऊन येऊन येणार कोण झाडाशिवाय आहेच कोण. कारण तुम्हाला सांगतो कोणताही पक्ष २०० वर्ष टिकत नाही.”
“एक आंब्याचं झाड १०० वर्ष फळं देतं. तेवढीच वर्ष सावली देतं. त्यामुळे यापुढे हिच घोषणा द्यायची. मला सांगा कोणत्या आमदार, खासदार, मुख्यमंत्री, खेळाडू, कलाकाराने सावली दिलेली कधी पाहिली आहे का? ऑक्सिजन दिलेला बघितला आहे का? मग कशाला त्यांना एवढं सेलिब्रिटी म्हणायचं. आपली झाडं हेच आपले सेलिब्रिटी आहेत. जे आपल्याला फळं, सावली, ऑक्सिजन देतात. अन्न, वस्त्र, निवारा या तिन्ही गोष्टी फक्त झाडं देतात.”
पुढे सयाजी शिंदे म्हणाले, “राजकारणी लोकांना आपापल्या पक्षाची काळजी करावी लागते. पक्षासाठी पैसा गोळा करावा लागतो. पक्षासाठी आपली मतं बदलावी लागतात. पण आपल्याला एकच काम करायचं आहे की झाडावर उडणाऱ्या पक्षांची आपण काळजी घ्यायची आहे.” झाडांची अधिक काळजी घ्या. वृक्षारोपण करा असा संदेश सयाजी यांनी त्यांच्या भाषमामधून देण्याचा प्रयत्न केला. तसेच यावेळी राजकीय टोलेबाजीही केली.