साताऱ्याच्या सामान्य कुटुंबातील मुलगा हैदराबादमध्ये पोहोचला अन् बघता बघता टॉलीवूडमध्ये सुपरस्टार झाला. दक्षिणेतील काही दिग्दर्शकांना ते लकी वाटतात, तर काही निर्मात्यांचे चित्रपट त्यांचं कास्टिंग झाल्याशिवाय पूर्ण होत नाहीत. टीव्हीवर लागणाऱ्या दाक्षिणात्य चित्रपटांमध्ये या मराठी माणसाला पाहिल्यावर एक वेगळाच अभिमान वाटतो. कन्नड, मल्लाळम या सिनेमांमधील खलनायकांची नावे आठवायची झाली तर एकच ‘कॉमन’ नाव समोर येईल ते म्हणजे सयाजी शिंदे. साधी राहणी, दमदार अभिनय, पिळदार मिशा आणि चेहऱ्यावर गोड हास्य घेऊन फिरणारा हा व्हिलन प्रत्येकाला भावतो. सिनेमाकडे प्रेम म्हणून नाहीतर श्रद्धा म्हणून पाहणारे सर्वांचे लाडके सयाजी शिंदे यांचा आज ६५ वा वाढदिवस.

साताऱ्यातील वेळेकामठी या लहानशा गावात सयाजी यांचा १३ जानेवारी १९५९ रोजी जन्म झाला. अतिशय सामान्य शेतकरी कुटुंबात त्यांचं बालपण गेलं. कॉलेजमध्ये शिक्षण पूर्ण करताना त्यांच्या मनात अभिनयाची आवड निर्माण झाली. परंतु, घरच्या परिस्थितीनुसार शिक्षण पूर्ण करत असताना सयाजी यांनी पाटबंधारे विभागात वॉचमनची नोकरी केली. पुढे, नाटकाची आवड जपण्यासाठी ते मुंबईला आले. मुंबईत आल्यावर त्यांनी मनाशी अभिनेता व्हायचं अशी खूणगाठ बांधली होती. याबद्दल त्यांनी सुरुवातीला कुठेही जाहीरपणे वाच्यता केली नव्हती.

Eknath Shinde
Eknath Shinde : शिंदे गटाची महत्त्वपूर्ण बैठक संपल्यानंतर एकनाथ शिंदेंची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले…
sunlight vitamin d
सूर्यप्रकाश भरपूर प्रमाणात असूनही भारतीयांमध्ये ‘Vitamin D’ची कमतरता…
Deputy Chief Minister Eknath Shinde consoled the family of Raghunath More thane news
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी रघुनाथ मोरे यांच्या कुटुंबियांचे केले सांत्वन
eknath shinde avoid delhi visit
शिंदे यांनी दिल्लीवारी टाळली ?
cm Eknath shinde
शिवसेनेत फिरती मंत्रीपदे; इच्छुक, नाराजांना थोपविण्यासाठी शिंदे यांचा तोडगा
Eknath Shinde On Maharashtra Karnataka Border Dispute :
Eknath Shinde : “कर्नाटक सरकारचा दडपशाहीचा प्रयत्न”, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी सुनावलं
Eknath Shinde is now Deputy CM and second ranked leader in Devendra Fadnavis government
एकनाथ शिंदेंचे सरकारमधील स्थान दुसऱ्या क्रमांकाचे, शिंदेंना ‘देवगिरी’
Only 30 percent of road works were completed during the Eknath Shinde government Mumbai news
‘दोन वर्षांत खड्डेमुक्त मुंबई’चे स्वप्न अधुरेच; शिंदे सरकारच्या काळात रस्त्यांची ३० टक्केच कामे पूर्ण

सातारा, मुंबई ते टॉलीवूड या प्रवासाविषयी सयाजी शिंदे सांगतात, “आपल्या पंखात जेवढं बळ असेल तेवढंच उंच जावं, कधीच कोणाची मदत घ्यायची नाही. आमच्या साताऱ्यात भैरोबाचा डोंगर आहे. तिकडे मी परीक्षेचा अभ्यास केला, नाटकाचा सराव केला. त्यामुळे मी नेहमीच असं सांगतो माझा गॉडफादर एकच तो म्हणजे सह्याद्रीचा डोंगर!”

१७ वर्षे बँकेत नोकरी करूनही त्यांचं नाटक लिहिणं आणि त्यात काम करणं या गोष्टी सुरू होत्या. तमिळ, तेलुगू, कन्नड, इंग्रजी, मराठी आणि हिंदी अशा सहा भाषांमधील नाटकांमध्ये त्यांनी काम केलं आहे. त्यांच्या ‘तुंबारा’ या गाजलेल्या नाटकाविषयी इंग्रजी वृत्तपत्रात छापून आलं होतं आणि हाच लेख अभिनेता मनोज वाजपेयीने पाहिला पुढे काय घडलं जाणून घेऊयात…

हेही वाचा : Irrfan Khan : त्याचं जाणं चटका लावून गेलं, ‘या’ मराठी अभिनेत्याने इरफान खानवरून ठेवलंय लाडक्या लेकीचं नाव

दाक्षिणात्य चित्रपटसृष्टी गाजवणारा मराठमोळा अभिनेता

रामगोपाल वर्मा यांच्या ‘शूल’ चित्रपटासाठी कलाकारांचं कास्टिंग सुरू होतं. मनोज वाजपेयी या सिनेमात मुख्य अभिनेता म्हणून काम करणार होता. चित्रपटाचा हिरो, तर ठरला पण सर्वत्र ‘शूल’च्या खलनायकासाठी शोधाशोध सुरू होती. बच्चू यादवची भूमिका कोण साकारणार? दिग्दर्शकाला या भूमिकेसाठी तेवढाच तगडा अभिनेता अपेक्षित होता. अशातच मनोज वाजपेयींना एका मराठी नाटकाचं पोस्टर दिसंल त्यावर सयाजी शिदेंचे भाव, देहबोली सगळं परफेक्ट वाटलं आणि सयाजी यांना रामगोपाल वर्मांच्या ऑफिसमध्ये बोलवण्यात आलं. ऑफिसमध्ये येताना त्यांची चालण्याची स्टाईल पाहूनच “हाच आपला बच्चू यादव!” असं रामगोपाल वर्मा म्हणाले. त्यांच्या ‘शूल’मधील अभिनयाचं खुद्द अमिताभ बच्चन यांनी फोन करून कौतुक केलं होतं.

हेही वाचा : “ताडपत्रीचं घर, गळणारं छत अन्…”, ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम गौरव मोरेला आठवले संघर्षाचे दिवस; म्हणाला, “माझ्या आईने…”

‘शूल’ चित्रपट सयाजी शिंदेंच्या आयुष्यात खऱ्या अर्थाने टर्निंग पॉइंट ठरला. याच कारण, त्याकाळी सेन्सॉरचे प्रमुख असलेल्या ज्ञानराज शेखर यांनी सयाजी यांचं काम फार जवळून पाहिलं होतं आणि यामुळेच त्यांना तमिळ चित्रपटसृष्टीत सुब्रमण्यम भारती या दिग्गज कवी व समाजसुधारकांची भूमिका साकारण्याची संधी मिळाली. त्याकाळी रजनीकांत, कमल हासन अशा प्रत्येक बड्या अभिनेत्याला भारती यांची भूमिका साकारायची होती. पण, त्यानंतर या भूमिकेसाठी सयाजी शिंदेंचं नाव निश्चित करण्यात आलं. त्यांचा पहिलाच तमिळ सिनेमा तब्बल शंभर दिवस सुरू होता. या भूमिकेमुळे सयाजींना दक्षिणेतील सिनेप्रेमींनी अक्षरश: डोक्यावर घेतलं होतं. दक्षिणेतील लोकांचा स्वभाव व ‘डाऊन टू अर्थ’ या मनोवृत्तीमुळे सयाजी शिंदे दक्षिणेत अधिक रमले. मराठीमध्ये ‘वजीर’, ‘कुंकू झालं वैरी’, ‘दोन घडीचा डाव’, ‘गल्लीत गोंधळ दिल्ली मुजरा’, ‘गोष्ट छोटी डोंगराएवढी’ असे मोजके पण अतिशय प्रभावशाली चित्रपट त्यांनी केले.

सयाजी शिंदेंनी आजवर मराठीपेक्षा चौपट जास्त तेलुगू चित्रपटांमध्ये काम केलं आहे. याविषयी ते सांगतात, “मला तेलुगू आता व्यवस्थित समजतं, बोलताही येतं. मी नेहमी सगळ्यांना एकच उदाहरण देतो. आपल्या महाराष्ट्रात कळसूबाई हे सगळ्यात उंच शिखर आहे. तिथे उंचावर जायला साधारण ३ तास लागतात. पण, तुम्ही नीट शांतपणे आरामात ते शिखर सर करू शकतात. अगदी तसंच आपलं ध्येय निश्चित असलं पाहिजे. सुरुवातीला मी रोज पाच तेलुगू शब्द शिकलो…दुसऱ्या दिवशी त्याचे दहा शब्द व्हायचे…त्यानंतर दहाचे शंभर झाले. एकदा तुम्हाला हजार शब्द समजले की, संपूर्ण भाषा येऊ लागते.”

हेही वाचा : शाहरुख खान : ४ वर्षांच्या ब्रेकनंतर ‘पठाण’ने बाजी पालटली अन् सांगितलं मीच खरा ‘बादशहा’!

सह्याद्री देवराई

जन्माला आल्यानंतर प्राण्याला आईच्या दूधाअगोदर प्राणवायूची गरज भासते आणि या जगण्यासाठी आवश्यक असलेल्या प्राणवायूसाठीच सह्याद्री देवराईची स्थापना केल्याचं सयाजी शिंदे यांनी नुकतंच एका कार्यक्रमात सांगितलं. महाराष्ट्रात २०१५-१६ काळात मोठा दुष्काळ पडला होता. त्यावेळी सयाजी यांच्या जवळच्या मित्राकडे तब्बल ४०० कोटींची जागा उपलब्ध होती. याच मित्रांच्या साथीने अभिनेत्याने दुष्काळग्रस्त गावात काम करायचं ठरवलं. यातूनच पुढे पुणे-बंगळुरू महामार्गाजवळ साताऱ्यातील म्हसवे गावाच्या बाजूला ‘सह्याद्री देवराई’ हा उपक्रम राबवण्यात आला. सध्या या प्रकल्पाअंतर्गत राज्यात ठिकठिकाणी रॉक गार्डन, कॅक्टस गार्डन, ऑर्किड गार्डन उभारण्यात येत आहेत. दुष्काळग्रस्त भागात १० लाखांहून अधिक वृक्षारोपण करण्याचा ध्यास या संस्थेने घेतला आहे. जगण्यासाठी लागणार्‍या ऑक्सिजन निर्मितीसाठी सयाजी यांनी सह्याद्री देवराई संस्था स्थापन केली. महाराष्ट्रात सहा ते सात ठिकाणी आता सह्याद्री देवराई उभी आहे. माणदेश, बीड, संगमनेर, औरंगाबाद शहरांमध्ये या संस्थेने लाखोंच्या घरात झाडं लावली आहेत. हे सामाजिक कार्य नसून मी माझा छंद जोपासण्यासाठी हे काम करतोय असं सयाजी आवर्जुन सांगतात.

वृक्षलागवडीत पुढाकार घेत या अभिनेत्याने संपूर्ण महाराष्ट्रात एक मोठी चळवळ उभी केली अन् पडद्यावर डॅशिंग खलनायक साकारणारे सयाजी शिंदे महाराष्ट्रातील घराघरांत खऱ्या अर्थाने नायक ठरले. अशा या हरहुन्नरी अभिनेत्याला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा!

Story img Loader