नाटक, चित्रपट, मालिका या तिन्ही माध्यमांमध्ये आपल्या दमदार अभिनयाचा ठसा उमटवून प्रेक्षकांच्या कायम स्मरणात राहणारे अभिनेते म्हणजे विजय चव्हाण. या तिन्ही माध्यमांमध्ये विजय चव्हाणांचं बहुमूल्य योगदान आहे. ‘कशात काय लफड्यात पाय’, ‘कार्टी प्रेमात पडली’, ‘जाऊ बाई हळू’, ‘टुरटूर’, ‘मोरूची मावशी’, ‘हयवदन’, ‘श्रीमंत दामोदरपंत’ यांसारख्या अनेक नाटकातून विजय चव्हाण यांनी मराठी रंगभूमी गाजवली. याशिवाय हिंदी भाषेतही त्यांनी आपल्या उत्कृष्ट अभिनयाने प्रेक्षकांची मनं जिंकली. अक्षय कुमारपासून बॉलीवूड अनेक कलाकार त्यांना आदराने हाक मारत.
अलीकडेच विजय चव्हाण यांच्या पत्नी विभावरी जोशी-चव्हाण व मुलगा वरद चव्हाण हे अभिनेत्री सुलेखा तळवलकरांच्या युट्यूब चॅनलवरील स्मृतिचित्र या कार्यक्रमात सहभागी झाले होते. यावेळी वरद चव्हाणने एका पुरस्कार सोहळ्यातील धर्मेंद्र व वडील विजय चव्हाणांचा किस्सा सांगितला.
हेही वाचा – ओळख, प्रपोज अन् मग होकार…; विजय चव्हाण व विभावरी जोशी यांची ‘अशी’ आहे लव्हस्टोरी
वरद म्हणाला, “बाबा जाण्याआधीचा मी एक किस्सा सांगतो. काही, काही माणसं फक्त करिअर आणि कर्तृत्वाने नाही तर मनाने तितकीच मोठी असतात. बाबा जाण्याच्या सात आठ महिन्यांपूर्वी त्यांना एक राज्य पुरस्कार मिळाला. बाबांना बरोबर धर्मेंद्र यांना सुद्धा तो पुरस्कार मिळाला होता. त्यावेळेस धर्मेंद्र यांचं वय ८०च्या आसपास असेल. बाबा तेव्हा व्हिलचेअरवर होते. कारण बाबांची तब्येत चांगली नव्हती. आम्ही ऑक्सिजन घेऊन फिरायचो.”
हेही वाचा – कार्तिकी गायकवाडच्या वडिलांचा मानाच्या पुरस्काराने गौरव, पोस्ट करत म्हणाली, “हा पुरस्कार म्हणजे साक्षात…”
“त्या पुरस्कार सोहळ्याला बाबा ऑक्सिजन पाइप लावून बसेल होते. त्यांच्या समोर धर्मेंद्र होते. बाबांनी त्यांना विनंती केली, सर तुमच्याबरोबर एक फोटो पाहिजे. ते म्हणाले, अरे का नाही. त्यानंतर बाबा उठायला गेले तितक्यात बाबांची ती अवस्था पाहून त्या वयात धर्मेंद्र म्हणाले, तुम्ही थांबा मी येतो. मग धर्मेंद्र आले बाबांच्या बाजूला बसून फोटो काढला. नंतर मग बाबा उभे राहिले. कारण एवढ्या मोठ्या दिग्गज कलाकारासमोर बसून राहिलेलं त्यांना ते योग्य वाटत नव्हतं. हा माझ्यासाठी खूप वेगळा अनुभव होता. मनाचा मोठेपणा काय असतो ना, तो मी धर्मेंद्र यांच्यात पाहिला. म्हटलं हे खूप काही शिकण्यासारखं आहे,” असं वरद म्हणाला.