आपल्या अभिनयाने मागील अनेक दशकं प्रेक्षकांचं भरभरून मनोरंजन करणारे प्रतिभावान अभिनेते म्हणजे सचिन पिळगांवकर होय. फक्त अभियच नव्हे तर गायन व दिग्दर्शनही त्यांनी केलं. त्यांनी आतापर्यंत अनेक सुपरहिट चित्रपट मराठी इंडस्ट्रीला दिले आहेत. त्यांनी हिंदीतही खूप काम केलं आहे. ६७ वर्षांचे सचिन पिळगांवकर यांनी एक खंत व्यक्त केली आहे. कोणी अभिनयासाठी विचारत नसल्याचं त्यांनी म्हटलं आहे.
सचिन पिळगांवकरांचा आगामी चित्रपट कोणता आहे, ते कोणत्या चित्रपटात दिसणार आहेत? असा प्रश्न त्यांना विचारण्यात आला होता. त्याबद्दल ते म्हणाले, “सध्यातरी आता मी पडद्यावर येणार नाही. कारण सध्या माझ्याकडे तसं काही काम नाहीये. मला कोणी अभिनेता म्हणून घेतही नाहीये. माझ्याकडे कोणी येतही नाही. तुम्ही आमच्याकडे अभिनेता म्हणून काम करा, असं मला कोणी सांगतही नाही. का येत नाहीत, हे मला माहिती नाही. मी अभिनय सोडला आहे, असं कदाचित त्यांना वाटत असेल. पण तसं नाहीये. ती चुकीची समजूत आहे, गैरसमज आहे.” ‘मुक्काम पोस्ट देवाचं घर’ या चित्रपटाच्या ट्रेलर लाँच कार्यक्रमात त्यांनी ही खंत व्यक्त केली होती.
सचिन पिळगांवकर यांनी काही महिन्यांपूर्वी त्यांचा सुपरहिट चित्रपट ‘नवरा माझा नवसाचा’ या चित्रपटाचा दुसरा भाग प्रेक्षकांच्या भेटीला आणला होता. ‘नवरा माझा नवसाचा २’ हा चित्रपट लोकांना चांगलाच आवडला. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई केली होती. त्यामुळे या चित्रपटाचा तिसरा भाग येणार का? अशी चर्चा होत आहे. याबाबत खुद्द सचिन पिळगांवकरांना विचारण्यात आलं.
‘नवरा माझा नवसा’चा ३ येणार का?
सचिन पिळगांवकर म्हणाले, “नवरा माझा नवसाचा ३ हा चित्रपट यायला हवा, असं लोकांना वाटत असेल तर त्यासाठी मी नक्कीच प्रयत्नशील असेन. प्रेक्षकांना जे हवं आहे, प्रेक्षकांच्या ज्या अपेक्षा आहे, त्या पूर्ण करायची ऊर्जा मला गणपती बाप्पा नेहमीच देत असतो. मला गणपती बाप्पााकडून नवरा माझा नवसाचा ३ सिनेमा करण्याचा आदेश कधी मिळतोय, याची मी वाट पाहतोय. तो आदेश मिळेल याची मला खात्री आहे.” प्रेक्षकांना या सिनेमाचा तिसरा भाग पाहायचा असेल तर तो आणणार, असं त्यांनी म्हटलं आहे. पण हा चित्रपट कधी येणार, ते मात्र अद्याप स्पष्ट नाही.