२०२३ या वर्षाची सुरुवात मराठी चित्रपटसृष्टीसाठी खास ठरली. रितेश देशमुखच्या ‘वेड’ या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर जबरदस्त कमाई केली. पाठोपाठ प्रदर्शित झालेल्या ‘वाळवी’ या चित्रपटानेही प्रेक्षकांची मनं जिंकली. नेहमीच्या पठडीतला हा चित्रपत नसूनही याने उत्तम कामगिरी केली. सुरुवातीला चित्रपटाला कमी शो मिळाले पण नंतर माऊथ पब्लिसिटीमुळे या चित्रपटाला प्रेक्षकांनी डोक्यावर घेतलं.
नुकतंच या चित्रपटाचे दिग्दर्शक परेश मोकाशी यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला. त्यानिमित्ताने ‘वाळवी’ चित्रपटाची टीम आणि मराठी कलाकारांनी एकत्र मिळून परेश यांचा वाढदिवस आणि या चित्रपटाचं यश साजरं करण्यासाठी एक खासगी पार्टी आयोजित करण्यात आली होती. या पार्टीत परेश यांची पत्नी आणि त्यांची सहलेखिका मधुगंधा कुलकर्णी आणि वाळवीचे संगीत दिग्दर्शक मंगेश धाकडे यांनी एक मोठी घोषणा केली.
आणखी वाचा : “प्रत्येकाला व्यक्तिस्वातंत्र्य…” उर्फी जावेदच्या पेहरावाबद्दल अलका कुबल यांचं वक्तव्य
परेश यांच्या वाढदिवसानिमित्त या दोघांनी ‘वाळवी २’ या चित्रपटाची घोषणा केली. परेश आणि मधुगंधा सध्या यावर काम करत आहेत आणि लवकरच या चित्रपटाच्या पुढील भागाबद्दल अपडेट समोर येतील अशी घोषणा करण्यात आली. पार्टीत उपस्थित असलेल्या लोकांनी यासाठी चांगलीच उत्सुकता दाखवली. चित्रपटातील कलाकार स्वप्नील जोशी, अनीता दाते हेदेखील या पार्टीत हजर होते.
‘वाळवी’ हा मराठीतील पहिला ब्लॅक कॉमेडी चित्रपट आहे. याआधी मराठीत असे प्रयोग फार क्वचित झाले आहेत. ‘झी स्टुडिओ’ आणि मधुगंधा कुलकर्णी यांनी मिळून केलेल्या ‘वाळवी २’ च्या घोषणेमुळे सगळेच मराठी प्रेक्षक आता याची आतुरतेने वाट पाहणार आहेत. या चित्रपटात स्वप्नील जोशी, शिवानी सुर्वे, सुबोध भावे आणि अनीता दाते यांच्या प्रमुख भूमिका होत्या. परेश मोकाशी यांनी या चित्रपटाचं दिग्दर्शक केलं होतं. याआधी परेश यांनी ‘हरिश्चंद्राची फॅक्टरी’, ‘एलिझाबेथ एकादशी’ अशा दर्जेदार चित्रपटांचं दिग्दर्शन केलं आहे.