अभिनेता सुबोध भावेने दिग्दर्शित केलेला ‘संगीत मानापमान’ हा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. ‘संगीत मानापमान’ या अजरामर नाटकावरून प्रेरित होऊन हा चित्रपट तयार करण्यात आला आहे. ‘संगीत मानापमान’ ह्या चित्रपटावरूनच यात संगीताची मजेशीर मेजवानी असल्याचे लक्षात येते. दिवाळीच्या मुहूर्तावर या सिनेमाचा टीजर प्रदर्शित झाला होता. आता या सिनेमातील पहिले गाणे प्रेक्षकांच्या भेटीस आले आहे. ‘वंदन हो’ हे या सिनेमातील पहिले गाणे प्रेक्षकांच्या भेटीस आले असून हे गाणे शंकर महादेवन, महेश काळे आणि राहुल देशपांडे यांनी गायले आहे.
‘कट्यार काळजात घुसली’नंतर पुन्हा एकदा प्रेक्षकांना संगीत विश्वातील दिग्गज संगीतकार शंकर महादेवन, गायक महेश काळे आणि राहुल देशपांडे यांच्या आवाजातील तिहेरी संगम अनुभवायला मिळणार आहे. या आधीही तिघांनी एकत्र येत गाणी गायली होती, परंतु चित्रपटातील गाण्यासाठी एकत्र येण्याची ही त्यांची पहिलीच वेळ आहे. ‘वंदन हो’ वैविध्यपूर्ण संगीत शैलींचा कळस आणि परंपरेचे मिश्रण असलेले गाणे आहे.
संगीतकार शंकर महादेवन हे “वंदन हो” या गाण्याबद्दल आपले मत व्यक्त करत म्हणाले की, “माझं भाग्य आहे की मला हे गाणं राहुल देशपांडे आणि महेश काळे यांच्या बरोबर करायला मिळालं, संपूर्ण टीम ही जरी ‘कट्यार काळजात घुसली’ची असली तरी या सिनेमाचं संगीत मात्र खूप वेगळं आहे. सुबोध भावे दिग्दर्शित या चित्रपटात अजून भरपूर अप्रतिम गायक आहेत. समीर सावंत यांनी सिनेमातील गाण्याचे बोल लिहिले आहेत. या उत्कृष्ट टीममुळे प्रेक्षकांना ही संगीतमय भेट नक्कीच आवडेल.”
राहुल देशपांडे म्हणाले की “मला अतिशय आनंद झाला, कट्यारचे दिवस आठवले, शंकरजी खूप मोठे जिनिअस आहेत, त्यांनी खूप छान कंपोझिशन केलंय, त्यामुळे मी स्वतःला खूप लकी समजतो.
इतकंच नव्हे तर महेश काळे यांनीसुद्धा भावना व्यक्त करत सांगितले की, “मानापमानचा हिरो म्हणजे या चित्रपटाची गाणी आहेत. मला खात्री आहे की, आमच्या आमच्या टीमचा नवीन येणारा ‘संगीत मानापमान’ चित्रपट तुम्हाला नक्की आवडेल.”
या चित्रपटात एकूण १४ गाणी आहेत, तर या गाण्यांना १८ दिग्गज गायकांनी गायले आहे. इतकंच नव्हे तर या चित्रपटाला सुरेख संगीत देणारे त्यातले सात गायक हे नॅशनल अवॉर्ड विनर गायक आहेत, त्यामुळे या चित्रपटाद्वारे सर्वश्रेष्ठ गायकांनी सजवलेली मैफिल आपल्याला पाहायला मिळणार आहे.
चित्रपटाचे दिग्दर्शन आणि प्रमुख भूमिका सुबोध भावे करणार असून, सुमित राघवन, वैदेही परशुरामी, उपेंद्र लिमये, नीना कुलकर्णी, निवेदिता सराफ सारख्या आणखी दिग्गज कलाकारांना आपण सिनेमात पाहू शकतो. ‘संगीत मानापमान’ १० जानेवारी २०२५ ला प्रदर्शित होणार आहे.