Sharad Kelkar : मराठीसह हिंदी कलाविश्वात आपल्या अभिनयाची छाप उमटवणारा हरहुन्नरी अभिनेता म्हणून शरद केळकरकडे पाहिलं जातं. त्याने २००४ मध्ये दूरदर्शनच्या ‘आक्रोश’ या मालिकेतून मनोरंजन विश्वात पदार्पण केलं होतं. यानंतर शरद अनेक टीव्ही शोचं सूत्रसंचालन करताना दिसला. त्याने ‘सीआयडी’, ‘उतरन’, ‘कुछ तो लोग कहेंगे’ यांसारख्या मालिकांमध्ये दीर्घकाळ काम केलं. छोट्या पडद्यावर झळकल्यानंतर त्याने मराठीसह बॉलीवूडमध्ये देखील आपली ओळख निर्माण केली. नुकत्याच लोकमत वृत्तपत्रासाठी लिहिलेल्या लेखात शरद केळकरने मराठी सिनेविश्वाबद्दल तसेच चित्रपटसृष्टीतील आर्थिक गणितं यावर आपली स्पष्ट मतं मांडली आहे.

मराठी सिनेसृष्टीचा विकास करण्यााठी काही गोष्टींकडे लक्ष देण्याची गरज असल्याचं यात शरद केळकरने यात नमूद केलं आहे. “मराठी चित्रपट चांगले असतात पण, थिएटरपर्यंत प्रेक्षकवर्ग पोहोचत नसल्याने चित्रपटांना अपेक्षित कमाई करणं जमत नाही. याच पार्श्वभूमीवर सिनेमांची संख्या कमी करायला हवी. वर्षाला प्रत्येक आठवड्यात दोन चित्रपट प्रदर्शित झाले तरी १०४ सिनेमे होतात. यापेक्षा जास्त सिनेमे बनवून काय करणार. यापेक्षा सर्वांनी मिळून कमिशन बेसिसवर सिनेमे बनवले पाहिजेत तेव्हाच, मराठी सिनेमाची गुणवत्ता सुधारून, आपले चित्रपट हिंदी आणि हॉलीवूड चित्रपटांशी स्पर्धा करू शकतील. वैयक्तिक हेवेदावे बाजूला ठेवून एकत्र येऊन इंडस्ट्री मोठी करण्याचा प्रयत्न करायला हवा.” असं मत शरद केळकरने मांडलं आहे.

हेही वाचा : EMI भरण्यासाठी नावडते चित्रपट केले; विवेक ओबेरॉय म्हणाला, “यशाचं मोजमाप वाढदिवसाला येणाऱ्या पुष्पगुच्छांच्या संख्येवरून…”

मराठी चित्रपटसृष्टीत उत्तम कलाकार, तंत्रज्ञ याशिवाय अप्रतिम पटकथा उपलब्ध आहेत. पण, द्रष्टेपणा नाही असं शरद केळकर या लेखातून स्पष्ट करतो. “चित्रपट हा नाटकासारखा नसावा, याउलट चित्रपटाने कल्पनेच्या पलीकडल्या विश्वात प्रेक्षकांना घेऊन गेलं पाहिजे. कारण आजच्या घडीला स्पर्धा आणि प्रेक्षकांसमोर ओटीटी माध्यमांसारखे पर्याय उपलब्ध असल्याने, सिनेमातून काहीतरी वेगळं समोर आलं पाहिजे” असं मत अभिनेत्याने मांडलं आहे. शिवाय बजेटची समस्या सोडवण्यासाठी दोन-तीन मोठ्या निर्मात्यांनी एकत्र येऊन बिग बजेट चित्रपट बनवला पाहिजे, त्यामुळे जोखीमही कमी होईल. असा सल्ला अभिनेत्याने दिला आहे.

कोणताही चित्रपट प्रेक्षकांपर्यंत पोहोचण्यासाठी प्रमोशन आणि मार्केटिंग करणं गरजेचं असतं. पण, ९० टक्के चित्रपट ओव्हर बजेट झाल्याने पुढचा खर्च केला जात नाही. “लोकांपर्यंत सिनेमा पोहोचवलाच नाही, तर ते सिनेमागृहात कसे येणार? मराठी चित्रपटांमध्ये आजपर्यंत जे करत आलो त्यात वैविध्यता आणली पाहिजे. वर्षाला येणाऱ्या १०० हून अधिक सिनेमांपैकी ‘वेड’, ‘बाईपण भारी देवा’ आणि ‘नवरा माझा नवसाचा’ असे दोन वर्षांत तीनच चित्रपट हिट होत असतील तर कसं होणार?” असा सवाल करत शरद केळकरने केला आहे.

हेही वाचा : ‘सहकुटुंब सहपरिवार’ मालिकेतील कलाकारांची ग्रेट भेट; निमित्त आहे खूपच खास

यासाठी संपूर्ण नफा किंवा तोटा आपला नाही, या तत्त्वावर काम करावं लागेल. कलाकार-तंत्रज्ञांना डील्स द्या असं सांगत शरद केळकर म्हणाला, “अभिनेत्याने सांगितलेल्या मानधनाच्या ५० टक्के रक्कम देऊन त्याला व्यवसायात भागीदारी द्या. कॅमेरामन, दिग्दर्शक, लाइन प्रोड्यूसर, संगीतकार यांच्या बाबतीतही असं करणं शक्य आहे. मी माझ्या परीने प्रयत्न करतो. माझ्या दोन्ही चित्रपटांची पूर्ण फी घेतली नाही. २० ते ३० टक्केच फी घेतली व उरलेली भागीदारी घेतली. वर्षाला १०-१२ मराठी चित्रपट हिट झाल्यास लोक पैसे लावण्यासाठी पुढे येतील.” पण यातंही अपवाद असून जर एखाद्याने गुणवत्तेचे पैसे आकारले तर तेही चुकीचं नाहीये असं मत शरद केळकरने मांडलं आहे.

Story img Loader