शाहीर साबळे यांच्या जीवनावर आधारित ‘महाराष्ट्र शाहीर’ हा चित्रपट २८ एप्रिल रोजी राज्यभरातील सिनेमागृहांमध्ये प्रदर्शित झाला. चित्रपटामध्ये शाहीर साबळेंचा जीवनप्रवास उलगडून सांगण्यात आला आहे. या चित्रपटाला प्रेक्षकांकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे. मराठी चित्रपटसृष्टीतील अनेक कलाकार चित्रपट पाहून आल्यावर प्रतिक्रिया देत आहेत. अशातच राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनीदेखील हा चित्रपट पाहिला आहे.
शरद पवारांचा राजीनामा देण्याचा निर्णय मागे, नेमकं काय म्हणाले?
शरद पवार यांनी चित्रपटगृहात जाऊन हा चित्रपट पाहिला. शरद पवार यांच्या लेक व खासदार सुप्रिया सुळे यांनी इन्स्टाग्रामवर एक व्हिडीओ शेअर करत पवारांनी ‘महाराष्ट्र शाहीर’ चित्रपट पाहिल्याची माहिती दिली. यावेळी शरद पवारांबरोबर त्यांच्या पत्नी प्रतीभा पवार व आमदार जितेंद्र आव्हाड देखील होते. शरद पवार यांनी चित्रपट पाहिल्यानंतर शाहीरांचे नातू व दिग्दर्शक केदार शिंदे, चित्रपटात मुख्य भूमिका साकारणारा अभिनेता अंकुश चौधरी, सना शिंदे व चित्रपटाच्या टीमची भेट घेतली व संवाद साधला.
“आदरणीय पवार साहेब यांनी नुकताच शाहीर साबळे यांच्या आयुष्यावर आधारीत ‘महाराष्ट्र शाहीर’ हा चित्रपट पाहिला. हा चित्रपट शाहीर साबळे यांची कथा तर मांडतोच पण सोबतच महाराष्ट्राचा इतिहास देखील सांगतो. हा अतिशय सुंदर चित्रपट असून आपणही अवश्य पाहावा,” असं कॅप्शन सुप्रिया सुळे यांनी हा व्हिडीओ शेअर करत दिलंय.
दरम्यान, मराठी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध दिग्दर्शक केदार शिंदे यांचे शाहीर साबळे आजोबा आहेत. केदार शिंदेंच्या आईचे ते वडील होते. केदार शिंदेंची लेक सनाचे शाहीर साबळे पणजोबा आहेत. एकंदरीतच ‘महाराष्ट्र शाहीर’ चित्रपट प्रेक्षकांना भावला आहे. मराठी कलाकार हा चित्रपट पाहिल्यानंतर कौतुक करत आहेत.