Sharad Ponkshe : सिनेमा, टेलिव्हिजन मालिका, ओटीटी माध्यमांची लोकप्रियता दिवसेंदिवस वाढत असली, तरीही या सगळ्यात रंगभूमीने प्रेक्षकांच्या मनात आपलं अढळस्थान आजही निर्माण केलेलं आहे. येत्या नव्या वर्षात अनेक नाटकं रंगभूमीवर येणार आहेत. तर, जयवंत दळवी यांच्या लेखणीतून साकारलेल्या ‘पुरुष’ नाटकाचे देखील रंगभूमीवर पुन्हा प्रयोग होत आहेत. या नव्याने सुरू असलेल्या नाटकात शरद पोंक्षे, अविनाश नारकर, स्पृहा जोशी, अनुपमा ताकमोगे, निषाद भोईर, नेहा परांजपे असे दिग्गज कलाकार प्रमुख भूमिकेत आहेत. नुकताच या नाटकाच्या प्रयोगादरम्यान एक अतिशय भावुक करणारा प्रसंग घडला. याची चर्चा सध्या सोशल मीडियावर होत आहे.
लेखिका व व्हॉइस ओव्हर आर्टिस्ट श्रुती आगाशेने इन्स्टाग्रामवर व्हिडीओ शेअर करत ‘पुरुष’ नाटकादरम्यान घडलेला एक भावनिक प्रसंग सांगितला आहे. शरद पोंक्षे नाटकाच्या प्रयोगादरम्यान अचानक ब्लँक झाले, यामुळे हा प्रयोग रद्द करावा लागला. हा क्षण त्यांच्यासाठी अतिशय भावनिक होता. पण, प्रेक्षकांनी त्यांच्या कलेला दाद देत यावेळी शरद पोंक्षे यांना मोलाची साथ दिली. नेमकं काय घडलं जाणून घेऊयात…
श्रुती म्हणाली, “आज आम्ही पुरुष या नाटकाला गेलो होतो. नाटक छान रंगात आलं होतं. पण, अचानक एका प्रवेशानंतर शरद पोंक्षे थांबले. ते म्हणाले, रसिकहो! मी पुरता ब्लँक झालोय. मला काहीच आठवत नाहीये. मला जरा वेळ मिळेल का? सगळ्या प्रेक्षकांनी टाळ्यांचा कडकडाट करून या गोष्टीला संमती दिली. पुढे, तो प्रयोग रद्द झाल्याचं घोषित करण्यात आलं. पण, प्रेक्षकांच्या विनंतीला मान देऊन शरद पोंक्षे पुन्हा मंचावर आले.”
“४० वर्षांच्या कारकिर्दीत पहिल्यांदाच असं झाल्याने त्यांना गहिवरून आलं होतं. पण, प्रेक्षकांनी त्यांना मनापासून दाद देत आतापर्यंत प्रयोग उत्तम झाला आणि यापुढचे प्रयोगही यशस्वी होतील अशा सदिच्छा सुद्धा दिल्या. मधल्या ब्रेकमध्ये प्रेक्षकांमध्ये चर्चा होत होत्या पण, कोणाच्याही बोलण्यामध्ये नाराजी किंवा तक्रारीचा सूर मला जाणवला नाही. मराठी प्रेक्षकांना सगळे कलाकार ‘रसिक मायबाप’ का म्हणतात हे मला आज कळलं. रसिक प्रेक्षक कलेला दाद देतात. वेळोवेळी टीकाही करतात पण, कलाकारांच्या कठीण क्षणांमध्ये त्यांच्या मनाला समजून घेत, त्यांच्या मनाला उभारीही देतात.” असं सांगत श्रुतीने कलाकारांसह प्रेक्षकांचं कौतुक केलं आहे.
दरम्यान, या नाटकातील शरद पोंक्षे यांच्या सहकलाकार अनुपमा ताकमोगे यांनी या व्हिडीओवर कमेंट करत आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. तसेच या प्रसंगानंतही शरद पोंक्षे यांनी पुढचा प्रयोग किती सुंदर केला याबद्दल त्यांनी सांगितलं आहे.
“मी या प्रयोगात त्यांच्याबरोबर काम करते, कालच आमचा रात्री हडपसरला प्रयोग होता.. शरदला आम्ही सगळे तोही रद्द करूया असं म्हणत होतो. पण, शरद पोंक्षे म्हणाले, मी विश्रांती घेतो मग ठरवू आणि मला सांगायला आनंद आणि अभिमान वाटतो की, शरदने हडपसरचा प्रयोग एकही वाक्य विसरणं सोडा एक शब्द ही इकडचा तिकडे न करता पुन्हा त्याच जोमाने आणि आत्मविश्वासाने केला. आपल्याकडचे रसिक प्रेक्षक खूप समजूतदार आहेत, त्यांनी ज्या पद्धतीने शरदला समजून घेतलं आणि पाठिंबा दिला तो अवर्णनीय होता. शरदचं काय आम्ही सगळेच रसिक प्रेक्षकांच्या प्रेमाने आणि आदराने भारावून गेलो.” असं अनुपमा यांनी या व्हिडीओवर कमेंट करत म्हटलं आहे.