अभिनेते शरद पोंक्षे हे त्यांच्या अभिनयाव्यतिरीक्त व्याख्यानांसाठी ओळखले जातात. ते ऐतिहासिक व्याख्यानं देत असतात. अलीकडेच त्यांनी ट्विटरवर त्यांच्या एका व्याख्यानाचा व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये त्यांनी महापुरूषांचा उल्लेख केला आहे. १५ ऑगस्ट १९४७ नंतर भारतात महापुरूष जन्माला येणं बंद झालंय, असं म्हणत त्यांनी त्यामागचं कारणही सांगितलं आहे.
शरद पोंक्षे व्हिडीओमध्ये म्हणाले, “१४ ऑगस्ट १९४७ सालापर्यंतचा इतिहास जर तुम्ही वाचलात, तर एक महापुरूष जन्माला येतो, तो संपेपर्यंत दुसऱ्या महापुरूषाला जन्माला घालतो. म्हणजे एक शंकराचार्य जन्माला आले, मग ज्ञानेश्वर माऊली जन्माला आली, मग रामदास स्वामी जन्माला आले, त्यानंतर तुकाराम महाराज जन्माला आले. त्याच काळात छत्रपती शिवाजी महाराज जन्माला आले. एक पेशवे जन्माला आले, तात्या टोपे जन्माला आले. झाशीच्या राणी जन्माला आल्या. त्यानंतर चाफेकर बंधू जन्माला आले, सावरकर जन्माला आले, टिळक जन्माला आले. जन्माला येतायत माणसं, जन्माला येतायत. अशातच १५ ऑगस्ट १९४७ आलं आणि माणसंच संपली ओ,” असं त्यांनी म्हटलंय.
“तुमची लाचारी…” बाजीराव पेशव्यांची तुलना छत्रपती शिवरायांशी केल्याने शरद पोंक्षे ट्रोल
पुढे ते म्हणतात, “आपला देश शेतीप्रधान का आहे, याचं फार महत्त्वाचं कारण हे आहे की उगवलेल्या रोपट्याचे सर्वच दाणे बाजारात विकायला जात नाहीत. त्यातले काही दाणे जन्माला आल्यानंतर बाजारात जाऊन विकायला उभं राहण्याऐवजी स्वतःला त्याच जमिनीमध्ये पुन्हा गाडून घ्यायला तयार होतात. ते गाडून घ्यायला तयार होतात, म्हणून त्याच्यातून दुसरे दाणे निर्माण होतात. ही साखळी आहे आणि ही साखळी १५ ऑगस्ट १९४७ ला संपली,” असं शरद पोंक्षे त्यांच्या व्हिडीओमध्ये म्हणाले आहेत.
काही दिवसांपूर्वी शरद पोंक्षे यांनी छत्रपती शिवाजी महाराज व राजा छत्रसाल यांच्या मैत्रीबद्दले एका व्हिडीओत सांगितलं होतं. तसेच त्यांनी शिवाजी महाराजांचं वचन पूर्ण करण्यासाठी बाजीराव पेशव्यांनी राजा छत्रसाल यांची कशा पद्धतीने मदत केली होती, याबद्दलही सांगितलं होतं. मात्र, त्यांचा हा व्हिडीओ पाहून नेटकऱ्यांनी त्यांना ट्रोल केलं होतं.