Sharad Ponkshe on friendship with Avinash Narkar: शरद पोंक्षे आणि अविनाश नारकर दोघेही मराठी मनोरंजन विश्वातील लोकप्रिय अभिनेते आहेत. त्यांच्या कारकिर्दीत त्यांनी विविध छटा असणाऱ्या भूमिका साकारीत प्रेक्षकांच्या मनावर राज्य केले आहे. फक्त सिनेमाच नाहीत, तर टीव्ही मालिका आणि नाटक माध्यमांतून या अभिनेत्यांनी प्रेक्षकांचे मनोरंजन केले आहे.
शरद पोंक्षे अभिनेते अविनाश नारकर यांच्याबाबत काय म्हणाले?
आजही हे दोन अभिनेते विविध भूमिकांतून प्रेक्षकांच्या भेटीला येत असतात. ‘२२ जून’, ‘बस स्टॉप’, ‘स्वरगंधर्व सुधीर फडके’, ‘धुडगूस’, ‘व्हॉट अबाऊट सावरकर’, ‘हिप हिप हुर्रे’, ‘ग्रे’ अशा अनेक चित्रपटांत शरद पोंक्षे आणि अविनाश नारकर यांनी एकत्र काम केले आहे. सध्या ते पुरुष या नाटकांत दिसत आहेत. आता शरद पोंक्षे यांनी सोशल मीडियावर पोस्ट करीत त्यांच्या मैत्रीबद्दल वक्तव्य केले आहे.
शरद पोंक्षे यांनी ‘पुरुष’ या नाटकातील अविनाश नारकर यांच्याबरोबरचे फोटो आणि ‘कलम ३०२’ चित्रपटातील त्यांचा एकत्रित फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहे. कलम ३०२ चित्रपट २५ वर्षांपूर्वी आणि पुरुष हे नाटक २५ वर्षांनंतर, असे मोठ्या अक्षरांत लिहिलेले दिसत आहे. या फोटोला कॅप्शन देत शरद पोंक्षे यांनी अविनाश नारकर व त्यांच्या मैत्रीबद्दल लिहिले, “१९६६ ला एकाच वर्षी जन्म घेतला. १९८९ ला बेस्टमध्ये एकाच वर्षी नोकरीला लागलो आणि २०२५ ला आज पुरुष या नाटकामध्ये एकत्र काम करतोय. ये दोस्ती हम नही छोडेंगे.” त्यांच्या या पोस्टवर चाहत्यांनी हार्ट इमोजी शेअर केल्याचे पाहायला मिळत आहे.
शरद पोंक्षे यांनी ‘मोकळा श्वास’, ‘संदूक’, ‘कनिका’, ‘हाय कमांड’, ‘फक्त सातवी पास’, ‘ही अनोखी गाठ’, ‘मी शिवाजी पार्क’ अशा अनेक चित्रपटांत सकारात्मक आणि नकारात्मक भूमिका साकारल्या आहेत. अभिनयाबरोबरच ते त्यांच्या स्पष्टवक्तेपणासाठीही ओळखले जातात. त्यांच्या वक्तव्याची बऱ्याचदा चर्चा होताना दिसते. पुरुष या नाटकातील त्यांच्या भूमिकेला प्रेक्षकांचे विशेष प्रेम मिळताना दिसत आहे. प्रेक्षक हे नाटक पाहण्यासाठी गर्दी करताना दिसतात.
अविनाश नारकर यांनी अनेक सिनेमा आणि मालिकांमधून त्यांचा वेगळा प्रेक्षकवर्ग निर्माण केला आहे. मिस यू मिस्टर, खतरनाक, बीपी अशा चित्रपटांत ते दिसले आहेत. सध्या पुरुष या नाटकाबरोबर ते लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेत काम करताना दिसत आहेत. जीवा व पार्थच्या वडिलांच्या भूमिकेत ते दिसत आहेत. ही मालिका सध्या लोकप्रिय ठरत आहे. सतत येणारे ट्विस्ट आणि एकापेक्षा एक कलाकार यांमुळे मालिकेला प्रेक्षकांचे प्रेम मिळत आहे. पुढे या मालिकेत काय ट्विस्ट येणार हे पाहण्यासाठी प्रेक्षक उत्सुक आहेत.