शरद पोंक्षे सध्या त्यांच्या ‘पुरुष’ या नाटकामुळे चर्चेत आहेत. लेखक जयवंत दळवी यांचं मराठी रंगभूमी गाजवणारं ‘पुरुष’ नाटक आहे. ‘पुरुष’ या नाटकात अभिनेते शरद पोंक्षे, अभिनेत्री स्पृहा जोशी, अभिनेते अविनाश नारकर, अनुपमा ताकमोगे, निषाद भोईर, नेहा परांजपे हे कलाकारही महत्त्वाच्या भूमिका साकारत आहेत. नुकताच बीडमध्ये या नाटकाचा प्रयोग झाला. ज्याठिकाणी हे नाटक झालं त्या नाट्यगृहाच्या अस्वच्छतेसंदर्भात शरद पोंक्षे यांनी केलेली पोस्ट सध्या चर्चेत आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

‘पुरुष’ नाटकाची टीम सध्या काही जिल्ह्यांच्या दौऱ्यावर आहे. यामध्ये १५ फेब्रुवारीला अहिल्यानगरमध्ये, १६ फेब्रुवारीला बीड, १७ फेब्रुवारीला नांदेड, १८ फेब्रुवारीला छत्रपती संभाजीनगर व १९ फेब्रुवारीला जळगावात या नाटकाचे प्रयोग होत आहेत. यापैकी बीडमध्ये प्रयोग करताना आलेला वाईट अनुभव शरद पोंक्षे यांनी इन्स्टाग्रामवर एका पोस्टमध्ये सांगितला.

‘पुरूष’ नाटकाचा बीड येथील यशवंतराव चव्हाण नाट्यगृहामध्ये प्रयोग झाला. तेव्हा या नाट्यगृहाचा अतिशय भयंकर अनुभव आला. अस्वच्छता, बाथरूमची भयाण अवस्था. त्याबद्दल कलाकारांनी खंत व्यक्त केली व निषेध नोंदवला. समोर बीड नाट्यपरिषद पदाधिकारी व उपायुक्त उपस्थित होते, असं कॅप्शन देत शरद पोंक्षे यांनी हा व्हिडीओ शेअर केला आहे.

शरद पोंक्षे म्हणाले, “अतिशय अप्रतिम रसिक-प्रेक्षक आहेत आणि या रसिक-प्रेक्षकांसमोर आमची कला सादर करण्यासाठी आम्ही इतक्या लांब, इतका प्रवास करून येत असतो. गंभीर विषयावरचं एक नाटक, इतका चांगला प्रतिसाद, इतक्या चांगल्या पद्धतीने तुम्ही ते रिसिव्ह करताय, त्यासाठी खरोखरच तुमचं कौतुक. पण रसिकहो, पुन्हा पुन्हा इथं येणं आम्हाला शक्य होणार नाही, कारण या नाट्यगृहाची दुरवस्था. इतकी भयानक दुरवस्था आहे की एसी थिएटरचं भाडं म्हणून आमच्याकडून २१ हजार रुपये भाडं घेतलं गेलं, पण नाट्यगृहात एअर कंडिशनर नाही. मुंबईतल्या थिएटरचं पण एवढं भाडं नाही. प्रसाधनगृहे नाहीत. बाथरूमची अवस्था इतकी भीषण आहे की महिला कलाकारांना जाणंच शक्य नाही. मेकअप रूम नाही, स्वच्छता नाही. या नाट्यगृहाला वालीच नाही. आज शासनाचे खूप मोठे अधिकारी इथे बसलेत, त्यांनी दखल घ्यावी, ही माझी नम्र विनंती आहे.”

आमची इच्छाच मेली – शरद पोंक्षे

पुढे ते म्हणाले, “ज्या कुणाच्या अंडर हे नाट्यगृह येत असेल, त्यांना बोलवून सांगा की जर अशीच नाट्यगृहाची अवस्था ठेवली, दर्जेदार नाटकं आणि कलाकारांपासून बीडचे रसिक-प्रेक्षक मुकेल. मला तर इथे परत यायची इच्छाच नाही. मी बीडला येईन, तुम्ही कार्यक्रमाला बोलावलंत तर तिकडे येईन, पण या थिएटरमध्ये येऊन नाटक करावं अशी आमची इच्छा आज मेली. खूपच भयानक परिस्थिती आहे. नाट्यरसिकांची सुद्धा नागरिक म्हणून एक जबाबदारी आहे, तुम्ही याच्यासाठी काहीतरी केलं पाहिजे, कारण बीडमध्ये चांगलं नाटक येणं बंद होईल. कारण अशा अवस्थेत आम्ही नाटक नाही करू शकत. मी बोलतोय त्याचा फार काही परिणाम होणार नाही याची मला खात्री आहे, कारण मी या विषयावर १००० वेळा बोलून झालंय, पण राहवत नाही. फार वाईट अवस्था आहे.”

नाट्यगृहाची अवस्था सुधारली नाही तर परत कधीच नाटक घेऊन बीडमध्ये येणार नाही, असं शरद पोंक्षे यांनी सांगितलं.