काँग्रेस नेते राहुल गांधी यांची ‘भारत जोडो’ यात्रा गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आहे. सध्या ही यात्रा महाराष्ट्रात आहे. पण याचदरम्यान हिंगोलीमध्ये बोलताना राहुल गांधी यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याबद्दल वक्तव्य केलं होतं. त्यांच्या या वक्तव्यानंतर नवा वाद निर्माण झाला आहे. सावरकरांनी देशाच्या विरोधात जाऊन केवळ काँग्रेसला विरोध करण्यासाठी इंग्रज राज्यकर्त्यांना मदत केली असा आरोप राहुल गांधी यांनी केला. राहुल गांधींच्या टीकेनंतर राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. अशातच आता अभिनेते शरद पोंक्षे यांनी थेट अंदमानमधून व्हिडीओ शेअर करत अप्रत्यक्षपणे राहुल गांधींना सुनावलं आहे.
शरद पोंक्षे सध्या अंदमानमध्ये आहेत. स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर अंदमान येथील सेल्यूलर जेलमध्ये होते. याच जेलमधल्या ज्या कोठडीमध्ये ते होते तिथे शरद पोंक्षे पोहोचले. तेथीलच व्हिडीओ शेअर करत त्यांनी राहुल गांधींना एक आव्हान दिलं आहे.
पाहा व्हिडीओ
शरद पोंक्षे यांनी यावेळी सावरकरांनी कोठडीत कोणत्या स्थितीत ठेवण्यात आलं होतं हे व्हिडीओच्या माध्यमातून दाखवलं आहे. शरद पोंक्षे यांनी यावेळी आपण संवाद साधत आहोत असं दाखवलं आहे. “अरे ए मुर्खा इकडे ये. कुठे भटकत असतोस? मुर्खासारखं जे काही तू फिरत आहेस, तसं फिरू नकोस. हिंमत असेल तर थेट इकडे ये. सेल्युलर जेलची कोठडी आहे ही. ही बघ सात बाय अकराची कोठडी आहे. याच्या खालची जमीन बघ. या जमिनीवरच झोपायचं. एवढीशी चड्डी, कैद्याचे कपडे, गळ्यात-हातात बेड्या, साखळदंड. कोपऱ्यातच संडास, लघवी करायची. तिथेच राहायचं,” असं सांगत शरद पोंक्षेंनी टीकाकारांना उत्तर देण्याचा प्रयत्न केला आहे.
“इथे ११ वर्ष तात्याराव राहिले. ब्रिटीशांनी त्यांना सोडलं नाही. त्यांच्या गळ्यामध्ये बिल्ला होता. त्यावर ‘डी’ असं लिहिलं होतं. डी म्हणजे अती धोकादायक (Dangerous). कोणत्याही कैद्याच्या बिल्ल्यावर ‘डी’ लिहिलं नव्हतं. फक्त त्यांच्याच बिल्ल्यावर ते दिसत होतं. माझं काहीच म्हणणं नाही, पण इथे ये. ११ वर्ष, ११ दिवस सोड पण एक दिवस तुझ्या गळ्यात सगळं अडकवतो. कच्च्या मांसाचे तुकडे, खराब अन्न, महारोग्यांच्या हाताने बनवलेलं अन्न, त्यातले किडे तुला खायला लावतो. हे सगळं कर माझ्या बाळा आणि मगच बोलून दाखव,” असा संताप शरद पोंक्षे यांनी व्यक्त केला आहे.