अभिनेते शरद पोंक्षे सध्या अंदमानमध्ये आहेत. त्यांच्या व्याख्यानाच्या कार्यक्रमासाठी ते अंदमानला पोहोचले आहेत. त्यांनी स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर हे ज्या अंदमान येथील सेल्युलर जेलमध्ये होते तिथे भेट दिली. त्यादरम्यानचा व्हिडीओ शरद पोंक्षे यांनी सोशल मीडिया अकाऊंटद्वारे शेअर केला होता. आता त्यांनी त्यांच्या व्याख्यानादरम्यानचा एक व्हिडीओ शेअर केला आहे. यामध्ये त्यांनी ३३ कोटी देवांबाबत भाष्य केलं आहे.
शरद पोंक्षे त्यांच्या व्याख्यानामधून विविध विषय सगळ्यांसमोर मांडताना दिसतात. सोशल मीडियाद्वारे तसेच त्यांच्या युट्युब चॅनलद्वारे ते व्याख्यानादरम्यानचे अनेक व्हिडीओ शेअर करताना दिसतात. आताही त्यांनी इन्स्टाग्रामद्वारे शेअर केलेल्या व्हिडीओमधून एक महत्त्वपूर्ण माहिती दिली आहे.
३३ कोटी देव म्हणजे नेमकं काय? हे शरद पोंक्षे या व्हिडीओमध्ये सांगताना दिसत आहेत. ते म्हणतात, “३३ कोटी देव यामधलं जे कोटी आहे ते सांकेतिक किंवा गणितामधलं कोटी नाही. दहा, शंभर, हजार, लाख, कोटी यामधलं ते कोटी नव्हे.”
“३३ कोटी देव म्हणजे ३३ प्रकारचे देव. इथे कोटीचा अर्थ प्रकार आहे. किती हिंदूना हे माहित आहे?” असं शरद पोंक्षे यांनी हा व्हिडीओ शेअर करत म्हटलं आहे. नेटकऱ्यांनीही त्यांच्या या व्हिडीओवर कमेंट करत आपण योग्य माहिती दिली असल्याचं म्हटलं आहे.