सुप्रसिद्ध संगीतकार व गायक सुधीर फडके यांच्या जिवनावर आधारित ‘स्वरगंधर्व सुधीर फडके’ हा चरित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. सुधीर फडके यांच्या १०५ व्या जन्मदिनाचे औचित्य साधून त्यांच्या आयुष्यावर आधारित घोषणा काही महिन्यांपूर्वी करण्यात आली. यात अभिनेता सुनील बर्वे बाबुजींच्या भूमिकेत दिसणार आहेत. तर, शरद पोंक्षे डॉ. हेडगेवारांचे पात्र साकारणार आहेत. या चित्रपटाबद्दल शरद पोंक्षेंनी एक पोस्ट शेअर केली आहे.
‘स्वरगंधर्व सुधीर फडके’ या चित्रपटाचे दिग्दर्शन योगेश देशपांडे करत आहेत. त्यांनी या चित्रपटातील कलाकारांना पत्रं पाठवली आहेत, या पत्रांची चांगलीच चर्चा आहे. शरद पोंक्षे, मृण्मयी देशपांडे, सुखदा खांडकेकर यांनी ही पत्रं सोशल मीडियावर शेअर केली आहेत. शरद पोंक्षेंनी पत्राचा फोटो शेअर करत लिहिलं, “स्वरगंधर्व सुधीर फडके सिनेमा लवकरच येतोय. मला या सिनेमात डॉ. हेडगेवारांची भूमिका करायची संधी मिळाली हे माझं भाग्य. दिग्दर्शक योगेश देशपांडेंचा मी आभारी आहे. त्यांनी हे सुरेख पत्र मला पाठवलं.”
दरम्यान, भक्तिसंगीत, सुगम संगीत आणि चित्रपट संगीत या प्रकारांमध्ये सुधीर फडके यांचं मोठं योगदान आहे. संगीत क्षेत्रात बाबुजी या नावाने ओळखल्या गेलेल्या सुधीर फडके यांचा एक उमदा तरुण संगीतकार ते प्रतिभावंत गायक ते संगीतकार हा प्रवास, वाटचालीतला संघर्ष, त्यांच्या व्यक्तित्वातले अनेक पैलू या चित्रपटातून प्रेक्षकांना पाहायला मिळतील.