‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या कार्यक्रमाने अनेक नवोदित कलाकारांना ओळख निर्माण करून दिली. आता हे कलाकार मराठीसह हिंदीत काम करताना दिसत आहेत. तसंच नवनवीन चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीस येत आहेत. त्यापैकी एक म्हणजे शिवाली परब. ‘महाराष्ट्राची क्रश’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या शिवाली परबचा लवकरच नवाकोरा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे. त्यामुळे सध्या ती खूप चर्चेत आहे.
शिवाली परबच्या आगामी चित्रपटाचं नाव ‘मंगला’ असं आहे. सत्य घटनेवर आधारित असलेल्या ‘मंगला’ चित्रपटात सुप्रसिद्ध गायिकेचा जीवनप्रवास पाहायला मिळणार आहे. या चित्रपटात शिवालीने प्रमुख भूमिका साकारली आहे. अलीकडेच ‘मंगला’ चित्रपटाचा टीझर आणि म्युझिक लाँच सोहळा पार पडला. या सोहळ्याला शिवालीच्या कुटुंबीयांनी खास उपस्थिती लावली होती. यावेळी तिच्या आई-वडिलांनी माध्यमांशी खास संवाद साधला.
हेही वाचा – “आमचा संसार चालत नाही, तो…”, कुशल बद्रिकेची ‘ती’ पोस्ट चर्चेत, म्हणाला…
‘राजश्री मराठी’शी संवाद साधताना शिवालीच्या आई-वडिलांनी तिचं भरभरून कौतुक केलं. शिवालीची आई म्हणाली, “जेव्हा तिने आम्हाला ‘मंगला’ चित्रपटातील लूकचा पहिल्यांदा फोटो पाठवला तेव्हा मला रडायलाच आलं. मग नंतर आम्ही दोन दिवस ‘मंगला’ चित्रपटाच्या चित्रीकरणाला गेलो होतो. १२-१२ तास तिच्या चेहऱ्यावर तो मेकअप असायचा. जेवायला नाही. त्यामुळे ती मधेमधे थोडा ज्युस प्यायची. पण, तिने मस्त भूमिका केली आहे. काम खूपच सुंदर केलं आहे. मला तिचा खूप अभिमान आहे.”
पुढे शिवाली परबचे वडील म्हणाले की, ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ आणि ‘मंगला’ चित्रपटातील आव्हानात्मक भूमिका यात खूप तफावत आहे. शिवालीने ते शिवधनुष्य खूप छानपणे पेललं आहे. १७ जानेवारी २०१५ला सर्वांना तो चित्रपट बघा.
दरम्यान, शिवाली परबचा कामाबद्दल बोलायचं झालं तर, ती ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या कार्यक्रमाबरोबर इतर काम लीलया सांभाळत आहे. आता ती मराठी रंगभूमीवर पाऊल ठेवणार आहे. प्रसाद खांडेकर लिखित, दिग्दर्शित ‘थेट तुमच्या घरातून’ या नाटकाच्या माध्यमातून शिवाली नाट्य क्षेत्रात पदार्पण करत आहे. या नाटकात शिवालीसह प्रसाद खांडेकर, ओंकार राऊत, भक्ती देसाई, प्रथमेश शिवलकर आणि नम्रता संभेराव पाहायला मिळणार आहे. २१ डिसेंबरपासून हे नाटक रंगभूमीवर येणार आहे.
© IE Online Media Services (P) Ltd