Shivani Surve Ajinkya Nanaware Wedding : मराठी मनोरंजनविश्वात सध्या लग्नसराई सुरू असल्याचं पाहायला मिळत आहे. अभिनेत्री शिवानी सुर्वे व अभिनेता अजिंक्य ननावरे यांचं लग्न नुकतंच थाटमाटात पार पडलं. या लोकप्रिय जोडप्याच्या लग्नाला कलाविश्वातील अनेक सेलिब्रिटींनी हजेरी लावली होती. गेल्या अनेक दिवसांपासून अजिंक्य-शिवानीच्या लग्नाची चर्चा सुरू होती. अखेर ३१ जानेवारीला साखरपुड्याचे फोटो शेअर करून अभिनेत्रीने तिच्या चाहत्यांना सुखद धक्का दिला होता. गुपचूप साखरपुडा उरकल्यानंतर या दोघांनी १ फेब्रुवारीला ठाण्यात जवळचे नातेवाईक व मित्रमंडळींच्या उपस्थितीत लग्नगाठ बांधली.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

अजिंक्य-शिवानीच्या लग्नाचे फोटो पाहण्यासाठी चाहते प्रचंड उत्सुक होते. या दोघांनी यापूर्वी लग्नसोहळ्यातील काही फोटो शेअर केले होते. परंतु, आता अजिंक्यने शेअर केलेल्या एका सुंदर व्हिडीओने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे. या व्हिडीओमध्ये त्यांच्या संपूर्ण लग्नाची लहानशी झलक पाहायला मिळत आहे. मेघा धाडेने बांधलेली अजिंक्य-शिवानीची लग्नगाठ, अभिनेत्याने घोड्यावरून लग्नमंडपात घेतलेली एन्ट्री, वरमाला, सप्तपदी या सगळ्या गोष्टी या व्हिडीओमध्ये पाहायला मिळतात.

हेही वाचा : “लग्नाच्या वाढदिवशी कर्करोगाबद्दल…”, अभिज्ञा भावेने सांगितला ‘तो’ प्रसंग; पतीबद्दल म्हणाली, “पोटाला ३५ टाके अन्…”

अजिंक्यने या व्हिडीओमध्ये त्याच्या लाडक्या सासू-सासऱ्यांचे म्हणजे शिवानी सुर्वेच्या आई-बाबांचे खास आभार मानले आहेत. अजिंक्य म्हणतो, “शिवानी माझ्या आयुष्यातील खूप महत्त्वाचा भाग आहे. ती जशी आहे तशी मला खूप गरजेची आहे आणि आता ती मला आयुष्यभर हवीये. थँक्यू थँक्यू… तुम्ही मला तुमची एवढी सोन्यासारखी मुलगी देत आहात.” सध्या मराठी कलाविश्वातील कलाकारांसह या दोघांचे चाहते या सुंदर व्हिडीओवर शुभेच्छांचा वर्षाव करत आहेत.

हेही वाचा : “वजन वाढलं, मासिक पाळीत अडचणी…”, जुई गडकरी ‘या’ गंभीर आजारांमुळे होती त्रस्त; म्हणाली, “तब्बल ८ वर्षांनी…”

दरम्यान, शिवानी सुर्वेच्या कामाबद्दल सांगायचं झालं, तर छोट्या पडद्यावर यश मिळाल्यानंतर सध्या अभिनेत्री चित्रपटांमध्ये काम करत आहे. ती शेवटची ‘झिम्मा २’ चित्रपटामध्ये झळकली होती. याशिवाय अजिंक्य ननावरे ‘सातव्या मुलीची सातवी मुलगी’ या मालिकेत प्रमुख भूमिका साकारत आहे. अनेक वर्षे एकमेकांना डेट केल्यावर आता या जोडप्याने लग्नबंधनात अडकत एका नव्या आयुष्याची सुरुवात केली आहे.

मराठीतील सर्व मराठी सिनेमा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Shivani surve ajinkya nanaware wedding actor shares beautiful video of marriage rituals sva 00