खासदार आणि प्रसिद्ध अभिनेते डॉ. अमोल कोल्हे यांचा ‘शिवप्रताप गरुडझेप’ या चित्रपटाची सध्या सर्वत्र चर्चा पाहायला मिळत आहे. हा चित्रपट गेल्या ५ ऑक्टोबरला प्रदर्शित झाला. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर चांगलाच गल्ला जमवला आहे. या चित्रपटाद्वारे प्रेक्षकांना क्रूर औरंगजेबाने केलेला कपटीपणा आणि छत्रपती शिवरायांनी बुद्धीचातुर्य जोरावर आग्र्याहून केलेली स्वत:ची सुटका या ऐतिहासिक घटनेचे साक्षीदार होता येणार आहे. सध्या या चित्रपटाला अनेक प्रेक्षक गर्दी करताना दिसत आहे. सध्या सोशल मीडियावर एका लहान मुलीचा व्हिडीओ व्हायरल होताना दिसत आहे. यात एक चिमुरडी शिवगर्जना देत असल्याचे पाहायला मिळत आहे.
शिवप्रताप गरुडझेप या चित्रपटाच्या अधिकृत इन्स्टाग्रामवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओत एक लहान मुलगी शिवगर्जना बोलताना दिसत आहे. आर्वी चोरगे असे या मुलीचे नाव आहे. हा व्हिडीओ ठाण्यातील इटर्निटी मॉलमधील चित्रपटगृहामधील आहे. काही दिवसांपूर्वी डॉ. अमोल कोल्हे यांनी या चित्रपटगृहाला भेट दिली. यावेळी एक लहान मुलगी शिवगर्जना बोलताना दिसत आहे. यानंतर अमोल कोल्हे यांनी तिला कडेवर घेत गोड पापा दिला. याचा एक व्हिडीओही त्यांनी पोस्ट केला आहे.
आणखी वाचा : “खासदार अमोल कोल्हे यांचा…” ‘शिवप्रताप गरुडझेप’ पाहिल्यानंतर शरद पवारांची प्रतिक्रिया
“काल इटर्निटी ठाणे येथील भेटीदरम्यान आर्वी चोरगे ही गोड मुलगी भेटली. महाराजांचा इतिहास योग्य वयात या लहानग्यांपर्यंत पोहोचला पाहिजे. शिवप्रताप गरुडझेप बनवण्यातले हे एक महत्वाचे कारण होते. समाधान आणि आनंद या दोन्ही गोष्टी काल हिला आणि अश्या मुलाबाळांबरोबर चित्रपट बघायला आलेल्यांना बघून मिळाला”, असे कॅप्शन त्यांनी दिले आहे.
आणखी वाचा : “माझ्या १६९ गर्लफ्रेंड होत्या अन् बिग बॉस…” शिव ठाकरेने केला खुलासा
दरम्यान हा चित्रपट विजयादशमीच्या शुभ मुहुर्तावर ५ ऑक्टोबरला प्रदर्शित झाला. या चित्रपटाची निर्मिती, लेखन आणि अभिनय अशी तिहेरी जबाबदारी डॉ. अमोल कोल्हे यांनी पेलली आहे. या चित्रपटात अमोल कोल्हे हे छत्रपती शिवाजी महाराज, ज्येष्ठ अभिनेते यतीन कार्येकर हे मोगल बादशाह औरंगजेब आणि अभिनेत्री मनवा नाईक ही छत्रपती शिवाजी महाराज यांची पत्नी सोयराबाई मोहिते या भूमिकेत दिसणार आहे. या चित्रपटाची निर्मिती ‘जगदंब क्रिएशन’ आणि डॉ. अमोल कोल्हे यांनी केली आहे. तर दिग्दर्शन कार्तिक राजाराम केंढे यांनी केले आहे.