Shocking video of Swapna Waghmare Joshi home: मराठी चित्रपट निर्मात्या स्वप्ना वाघमारे जोशी यांना मुंबईतील त्यांच्या घरी एक धक्कादायक अनुभव आला. त्यांच्या घरात रात्री एक चोर शिरला, घरात पाळीव बोका होता, त्याने आवाज केल्यामुळे त्या चोराबद्दल कळालं आणि मुद्देमाल वाचला. चित्रपट निर्माते अशोक पंडित यांनी त्यांच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर हा व्हिडीओ शेअर करत स्वप्ना यांच्या घरी घडलेल्या घटनेची माहिती दिली. या व्हिडीओत चोर घरात कशाप्रकारे आला आणि निघून गेला ते पाहायला मिळत आहे.
चित्रपट निर्माते अशोक पंडित हे स्वप्ना वाघमारे जोशी यांचे मित्र आहेत. त्यांनी स्वप्ना यांच्याबरोबर इन्स्टाग्रामवर कोलॅब करत व्हिडीओ शेअर केला व घडलेला प्रकार सांगितला. त्यांनी शेअर केलेल्या व्हिडीओत सीसीटीव्ही फुटेज दिसतंय, त्यात चोर खिडकीतून त्यांच्या घरात घुसताना दिसतो.
“क्राइम पेट्रोलची खरी घटना सादर करतोय. हा व्हिडीओ सर्वांसाठी आहे, खासकरून एकटे राहणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांसाठी. चित्रपट निर्मात्या स्वप्ना वाघमारे जोशी यांच्या (लोखंडवाला कॉम्प्लेक्स अंधेरी पश्चिम मुंबई) सहाव्या मजल्यावरील घरात चोर पाईपच्या मदतीने चढला. पण घरातील एका सदस्याला तो दिसला, त्यानंतर तो उडी मारून पळून गेला. आजकाल सुरक्षा रक्षक एकतर मोबाईल पाहण्यात किंवा झोपण्यात व्यग्र असतात. हा व्हिडीओ जास्तीत जास्त शेअर करा,” असं कॅप्शन अशोक पंडित यांनी या व्हिडीओला दिलं आहे.
व्हिडीओत चोर पाइपच्या मदतीने घरात शिरताना दिसतोय. त्यानंतर तो घरातील जवळपास सर्वच खोल्या फिरतो, ड्रॉवर चेक करतो. या चोराने स्वप्ना यांच्या मुलीची पर्स लांबवली, त्यात सात-आठ हजार रुपये होते, असं त्यांनी म्हटलंय. सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसतंय की चोरटा घरात फिरत असताना तिथे एक बोका फिरतोय, नंतर तो आवाज करतो आणि त्याच्या आवाजामुळे स्वप्ना यांचा होणारा जावई तिथे पोहोचतो. तो चोराचा पाठलाग करतो, पण चोर ज्या खिडकीतून आत आला तिथूनच तो उडी मारून पळून निघून जातो.
या घटनेबद्दल स्वप्ना यांनी आंबोली पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. अशोक पंडित यांनी शेअर केलेला हा व्हिडीओ लाखो लोकांनी पाहिला आहे. ते या व्हिडीओवर कमेंट करून हा प्रकार धक्कादायक असल्याचं म्हणत आहेत. प्रार्थना बेहेरे, जयंती वागधरे, दिपाली सय्यद यांनी यावर कमेंट्स केल्या आहेत.
स्वप्ना वाघमारे जोशी या टीव्ही मालिकांच्या दिग्दर्शिका आणि निर्मात्या आहेत. ‘रंग बदलती ओढणी’, ‘तुला कळणार नाही’ आणि सविता दामोदर परांजपे या त्यांच्या काही लोकप्रिय मालिका आहेत.