मराठीसह बॉलीवूड मनोरंजनविश्वात श्रेयस तळपदेने स्वत:ची एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. मालिका, चित्रपट व नाटक अशा तिन्ही माध्यमांमध्ये त्याने आपल्या अभिनयाचा ठसा उमटवला आहे. काही दिवसांआधी श्रेयसला हृदयविकाराचा झटका आल्याची बातमी समोर आली होती. यानंतर मुंबईतील नामांकित रुग्णालयात अभिनेत्यावर उपचार करण्यात आले होते. एवढ्या मोठ्या संकटातून घरी परतल्यावर आता हळुहळू श्रेयसच्या तब्येतीत सुधारणा होत आहे.
श्रेयस काही दिवसांपूर्वी त्याच्या वाढदिवसानिमित्त पापाराझींसमोर आला होता. आता अभिनेता आजारपणानंतर लवकरच मोठ्या पडद्यावर दमदार कमबॅक करण्यासाठी सज्ज झाला आहे.
हेही वाचा : “बोगद्यामध्ये १ तास अडकून…”, आदेश बांदेकरांनी सांगितला प्रवासादरम्यानचा अनुभव; म्हणाले, “एका चुकीमुळे…”
महेश मांजरेकर दिग्दर्शित ‘ही अनोखी गाठ’ या चित्रपटाची नुकतीच सोशल मीडियावर घोषणा करण्यात आली आहे. यात श्रेयस तळपदे आणि गौरी इंगवले यांच्या प्रमुख भूमिका असून या चित्रपटाची कथा, पटकथा महेश मांजरेकर यांची आहे. याशिवाय चित्रपटाचे संवाद गणेश मतकरी यांचे आहेत. ‘ही अनोखी गाठ’ च्या निमित्ताने महेश मांजरेकर आणि श्रेयस तळपदे ही जोडी पहिल्यांदा एकत्र येत आहेत. हा चित्रपट १ मार्च रोजी प्रदर्शित होणार आहे.
दिग्दर्शक महेश मांजरेकर म्हणतात, ‘झी स्टुडिओजसोबत या आधीही अनेकदा काम केले असून पुन्हा एकदा नवा चित्रपट घेऊन आलो आहे. श्रेयस आणि गौरी यांची केमिस्ट्री पाहणं औस्तुक्याचे ठरेल. हळूहळू चित्रपटातील गोष्टी समोर येतीलच.’’
झी स्टुडिओजचे बिझनेस हेड मंगेश कुलकर्णी म्हणतात, “झी स्टुडिओज नेहमीच प्रेक्षकांसाठी दर्जेदार चित्रपट घेऊन येते. झी स्टुडिओज आणि महेश मांजरेकर हे एक समीकरण झालं आहे. त्यामुळे प्रेक्षकांसाठी एक आगळीवेगळी प्रेमकहाणी घेऊन येण्यास आम्ही सज्ज झालो आहोत.”