अभिनेता श्रेयस तळपदेला गेल्यावर्षी १५ डिसेंबरला हृदयविकाराचा झटका आला होता. यानंतर अभिनेत्यावर अंधेरीमधील वेलव्हू रुग्णालयात अँजिओप्लास्टी करण्यात आली. कायम स्वत:च्या फिटनेसकडे लक्ष देणाऱ्या श्रेयसला हृदयविकाराचा झटका आल्याने सर्वानाच धक्का बसला होता. डिसेंबर महिन्यात तो ‘वेलकम टू द जंगल’ या चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यग्र होता. याच सेटवरून घरी परतल्यावर त्याला हृदयविकाराचा झटका आला. आता साधारण अडीच महिन्यांनी अभिनेता पुन्हा एकदा कामावर परतला आहे. नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत अभिनेत्याने त्याच्या तब्येतीबद्दल खुलासा केला आहे.
श्रेयस तळपदे न्यूज १८ शी संवाद साधताना याबद्दल म्हणाला, “या सगळ्या आजारपणातून सावरल्यावर पुन्हा सेटवर येण्याआधी मी थोडाफार नर्व्हस होतो. पुन्हा काही गडबड तर होणार नाही ना…या सगळ्या गोष्टी माझ्या डोक्यात चालू होत्या. सेटवर परतल्यावर मी सतत माझा हार्टरेट तपासत होतो. अर्थात मी जास्त घाबरलो होतो. परंतु, डॉक्टरांनी मला कसलंही दडपण घेऊ नकोस, निश्चिंत राहा असं सांगितलं आहे. याशिवाय कोणत्याही जड वस्तू उचलू नकोस अशा सूचना सुद्धा दिल्या आहेत.”
हेही वाचा : Video : पती निक जोनस व लेकीसह अयोध्येला पोहोचली प्रियांका चोप्रा, घेतलं रामलल्लाचं दर्शन, व्हिडीओ व्हायरल
श्रेयस पुढे म्हणाला, “अलीकडे मी डॉक्टरांनी दिलेल्या सल्ल्यानुसार काम करत आहे. माझ्या कुटुंबातील जवळच्या लोकांना मी या आजारामुळे गमावलं आहे. माझे बाबा व काकांना हृदयविकाराचा झटका आला होता.”
हेही वाचा : Video : मायलेकींची चर्चा! किशोरी गोडबोलेंच्या लेकीने शेअर केला खास व्हिडीओ, पूजा सावंत कमेंट करत म्हणाली…
दरम्यान, अहमद खान दिग्दर्शित ‘वेलकम टू द जंगल’ या चित्रपटात श्रेयस तळपदेसह अक्षय कुमार, रवीना टंडन, दिशा पटानी, जॅकलिन फर्नांडिस, अर्शद वारसी, संजय दत्त, तुषार कपूर आणि राजपाल यादव हे कलाकार झळकणार आहेत. मीडिया रिपोर्ट्सनुसार, हा चित्रपट यावर्षी ख्रिसमसला प्रदर्शित होणार आहे.