अभिनेता श्रेयस तळपदेला १५ डिसेंबर २०२३ रोजी हृदयविकाराचा झटका आला. यानंतर अभिनेत्यावर अंधेरीमधील वेलव्हू रुग्णालयात अँजिओप्लास्टी करण्यात आली. स्वत:चा फिटनेस जपणाऱ्या या लोकप्रिय अभिनेत्याला अचानक हृदयविकाराचा झटका आल्याने सर्वांनाच धक्का बसला होता. या संपूर्ण काळात श्रेयसला त्याची पत्नी दीप्तीने खंबीरपणे साथ दिली. हृदयविकाराचा झटका आलेल्या श्रेयसला त्याच्या पत्नीने मृत्यूच्या दारातून परत आणलं. १५ डिसेंबरला नेमकं काय काय घडलं? याबद्दल या जोडप्याने एबीपी माझाला दिलेल्या मुलाखतीत खुलासा केला आहे. दीप्तीने श्रेयसला हृदयविकाराचा झटका येण्यापूर्वीचा व त्यानंतरचा संपूर्ण घटनाक्रम सांगितला.
श्रेयसच्या आजारपणाबद्दल सांगताना त्याची पत्नी म्हणाली, “मी आणि श्रेयस त्यादिवशी संध्याकाळी पाच वाजेपर्यंत फोनवर बोललो होतो. तो पूर्णपणे बरा होता…गुरुवारी पहिल्यांदाच मी उपवास धरला असल्याने श्रेयस पूर्णवेळ माझी चेष्टा करत होता. पॅकअप लवकर होणार असल्याने आम्ही संध्याकाळी बाहेर जाणार होतो. त्याची नेहमीची सवय आहे तो पॅकअप झाल्यावर मला फोन करतो आणि सगळ्या अपडेट देतो. फोनवर तो एवढंच म्हणाला की, आज बाहेर जायचं रद्द करूया मी खूप जास्त थकलो आहे. घरी आल्यावर त्याचा चेहरा वेगळाच दिसत होता. मला त्याच्याकडे पाहून हृदयविकाराची कोणतीही लक्षणं जाणवली नाहीत. पण, तरीही तो नेहमीसारखा दिसत नाहीये हे मला जाणवलं. त्यानंतर मी डॉक्टरांना फोन केला त्यांना सगळी माहिती दिली. शेवटी मी डॉक्टरांना मेसेज केला की, मी त्याला घेऊन रुग्णालयात जातेय.”
हेही वाचा : “दात पडले, रक्ताने रुमाल माखला अन्…”, विजू मानेंनी सांगितला कुशल बद्रिकेचा कठीण काळ; म्हणाले, “३५ मिनिटं…”
दीप्ती पुढे म्हणाली, “आम्ही जायला निघालो आणि कारमध्ये बसल्यावर तो खूप अस्वस्थ झाला होता. त्यावेळी त्याने मला सांगितलं की, माझा हात खूप दुखतोय, ढेकर येत आहेत. तेव्हा मला जाणवलं ही लक्षणं काहीतरी वेगळी आहेत…आपण लवकरात लवकर रुग्णालयात जाऊया. रस्त्यात ट्राफिक असल्याने मी श्रेयसला म्हटलं आपण चालत जाऊया…पण, त्याला ते शक्य होत नव्हतं. तेवढ्यात माझा ड्रायव्हर म्हणाला, “मॅडम मी गाडी पुढे घेतो…” त्याने हे सांगितल्यावर एक मिनिट पण झालं नव्हतं. तेवढ्यात श्रेयसने वर धरलेला हात खाली सुटला, त्याचे पाय आतल्या बाजूला वाकडे झाले आणि सगळं थांबलं. त्याची हालचाल थांबली, मी त्याला हाक मारली काहीच होत नव्हतं…मी त्याचा चेहरा सुद्धा नाही पाहिला. मी तशीच त्याच्या अंगावरून बाहेर पडून दरवाजा उघडला. आजूबाजूच्या बाइकवाल्यांना धक्का मारून हॉस्पिटलकडे धावत सुटले. तिथल्याच बाइकवाल्यांच्या मदतीने मी याला गाडीतून बाहेर काढलं. याचदरम्यान हॉस्पिटलचा स्टाफ सुद्धा मदतीला आला.”
हेही वाचा : सद्य राजकीय स्थितीवर ज्येष्ठ अभिनेते मोहन आगाशेंनी मांडलं परखड मत; म्हणाले, “सगळ्याच नेत्यांकडून…
“माणसाची काहीतरी हालचाल असते… बरेच रुग्ण डोळे उघडून आहे मी बरा आहे वगैरे असे संकेत देतात पण, श्रेयसकडून कोणताच प्रतिसाद मिळत नव्हता. मला काहीच सुचत नव्हतं. श्रेयसला घेऊन मी थेट आयसीयूच्या दिशेने धावले. डॉक्टरांनी आत घेतल्यावर सीपीआर सुरू केला. त्याला पहिला शॉक दिला काहीच हालचाल झाली नाही, शेवटी दुसरा शॉक दिल्यावर त्याची हालचाल झाली. या काळात आम्हाला ज्यांनी मदत केली त्यांचे मी खरंच खूप आभार मानेन. या जन्मात ते ऋण फेडणं शक्य नाही” असं दीप्तीने सांगितलं.