मराठीसह बॉलीवूड कलाविश्वात अभिनेता श्रेयस तळपदेने आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. परंतु, गेल्यावर्षीच्या अखेरिस श्रेयसला वैयक्तिक आयुष्यात मोठ्या कठीण प्रसंगाचा सामना करावा लागला. त्याला चित्रपटाच्या शूटिंगवरून घरी परतल्यावर १५ डिसेंबर २०२३ रोजी हृदयविकाराचा झटका आला. यानंतर अभिनेत्यावर अंधेरीमधील वेलव्हू रुग्णालयात अँजिओप्लास्टी करण्यात आली होती. आता श्रेयसची प्रकृती एकदम उत्तम असून तो आरोग्याची योग्य ती काळजी घेत आहे. परंतु, नुकत्याच एका मुलाखतीत श्रेयसने हृदयविकाराचा झटका येण्याबाबत काही प्रश्न उपस्थित केले आहेत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

“मी धुम्रपान करत नाही, सारखं मद्यपान सुद्धा करत नाही. महिन्यातून एकदा किंवा लिमिटमध्ये मी ड्रिंक करतो. तंबाखू खात नाही. हृदयविकाराचा झटका आला तेव्हा माझं कोलेस्ट्रॉल निश्चितच थोडं जास्त होतं. पण, आता माझे सगळे रिपोर्ट्स नॉर्मल आहेत. औषधं आणि योग्य उपचारांमुळे आता कोलेस्ट्रॉल लेव्हलवर आलंय. मला डायबिटीज, ब्लज प्रेशर असा कोणताही त्रास नाहीये. त्यामुळे मला अचानक हार्ट अटॅक कसा येऊ शकतो” असा सवाल श्रेयसने नुकताच lehren retro ला दिलेल्या मुलाखतीत उपस्थित केला.

हेही वाचा : ‘नवरी मिळे हिटलरला’ फेम अभिनेत्याच्या घरी चिमुकलीचं आगमन, पहिली झलक शेअर करत म्हणाला, “इतकं भारावून जाणं…”

लसीकरणामुळे तुला हृदयविकाराचा झटका आला का? यावर श्रेयस म्हणाला, “आरोग्याची एवढी काळजी घेऊन अटॅक आला त्यामुळे मला वाटतं खरंच यामागे काहीतरी दुसरं कारण असू शकतं. मी या थिअरीला नक्कीच नाकारू शकत नाही. करोनाची लस घेतल्यानंतर मला तुलनेने जास्त थकवा जाणवू लागला होता. कदाचित लसीकरण किंवा कोव्हिडमुळे सुद्धा मला हा त्रास ( हार्ट अटॅक ) झाला असेल आपण नाकारू शकत नाही. आता कोव्हिड-१९ आजारामुळे की लसीकरणामुळे हे नेमकं कशामुळे झालं मला कल्पना नाही. पण, नक्कीच हार्ट अटॅकचा या दोन्हीपैकी एका गोष्टीशी संबंध आहे.”

हेही वाचा : आज्जीबाई जोरात

अभिनेता पुढे म्हणाला, “आपण सगळ्यांनीच संबंधित कंपनीवर विश्वास ठेवला. आपण आपल्या शरीरासाठी कोणती लस घेतली, त्यात काय होतं हे आपल्याला माहिती नाही ही गोष्ट खूपच दुर्दैवी आहे. कोव्हिड-१९ च्या आधी आपण अशा घटना ऐकल्या नव्हत्या. त्यामुळे या व्हॅक्सिनमुळे आपल्या शरीरात नेमका काय बदल झाला हे जाणून घेण्यासाठी मी उत्सुक आहे. अटॅकचं कारण कोव्हिड आहे की लस हे मी ठामपणे सांगू शकत नाही कारण माझ्याकडे ठोस पुरावे नाहीत.”

हेही वाचा : Swargandharva Sudhir Phadke Movie Review : तोच चंद्रमा नभात…

दरम्यान, हृदयविकाराचा झटका आला त्या दिवशी श्रेयस ‘वेलकम टू द जंगल’ या चित्रपटाचं शूटिंग करत होता. शूटिंग संपल्यावर त्याला अस्वस्थ वाटू लागलं आणि तो व्हॅनिटी व्हॅनकडे पोहोचला. त्याचा डावा हात भयंकर दुखत होता त्याच अवस्थेत तो घरी गेला आणि त्याची पत्नी दीप्तीने प्रसंगावधान दाखवून त्याला थेट रुग्णालयात दाखल केलं होतं.

मराठीतील सर्व मराठी सिनेमा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Shreyas talpade wonder if cardiac arrest is impact of covid vaccine what is reason of heart attack sva 00