दिग्दर्शक, लेखक, अभिनेता, निर्माता, गीतकार, अशी श्रीरंग गोडबोले (Shrirang Godbole) यांची ओळख त्यांचे अष्टपैलू व्यक्तिमत्त्व दाखवून देते. ‘घडले बिघडले’, ‘अग्निहोत्र’, ‘अमर प्रेम’, ‘गुंतता हृदय हे’, ‘एका लग्नाची दुसरी गोष्ट’, ‘ती फुलराणी’ अशा मालिकांसाठी ते ओळखले जातात. त्याबरोबरच ‘मराठी पाऊल पडते पुढे’, ‘एकापेक्षा एक’, ‘तुझ्यात जीव रंगला’, ‘अग्गं बाई सासूबाई’, अशा अनेक मालिकांची शीर्षकगीते त्यांनी लिहिली आहेत. तसेच गाजलेल्या चित्रपटांतील काही गाणीदेखील त्यांनी लिहिली आहेत. त्याबरोबरच त्यांनी निर्माता म्हणूनही काम केले आहे. आता त्यांनी एका मुलाखतीत मराठी चित्रपटसृष्टीला दरवर्षी किती कोटींचे नुकसान होते, याबाबत परखड प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.
व्यावसायिक दृष्टीनं…
श्रीरंग गोडबोले यांनी नुकतीच अमोल परचुरेंच्या यूट्यूब चॅनेलला मुलाखत दिली. या मुलाखतीत त्यांनी इंडियन मॅजिक आय या त्यांच्या निर्मात्या संस्थेकडून आता चित्रपट निर्मिती का केली जात नाही, याबाबत त्यांनी वक्तव्य केले. श्रीरंग गोडबोले त्या संदर्भात म्हणाले, “आम्ही सहा चित्रपटांची निर्मिती केली. व्यावसायिक दृष्टीनं जर बोलायचं झालं तर, आम्ही चिंटू १ आणि चिंटू २, असे लहान मुलांचे दोन चित्रपट केले. ते व्यावसायिकदृष्ट्या तसे यशस्वी झाले. अगदी आमचा पहिला सिनेमा कार्यकारी निर्मिती असलेला सिनेमा होता तो म्हणजे हरिश्चंद्राची फॅक्टरी. त्याला संपूर्ण जगभरातून चांगला प्रतिसाद मिळाला होता. त्यानंतर ‘तुह्या धर्म कोंचा’ हा अहिराणी सिनेमा केला होता. त्याला राष्ट्रीय पुरस्कार मिळाला. त्यानंतर आम्ही पितृ नावाचा सिनेमा केला. मग त्यानंतर बाजी नावाचा सिनेमा केला. काही चित्रपटांना अर्थसाह्य केलं आणि आतासुद्धा आम्ही काही चित्रपटांना अर्थसाह्य करीत आहोत. निर्माता म्हणून नाव कदाचित नसेल.”
“चित्रपट निर्मिती थांबवण्यामागचं कारण थोडंसं असं आहे की एकंदरीत माझ्या असं लक्षात आलं आणि त्यामध्ये मी एकटा नाही. आम्हा सगळ्याच निर्मात्यांच्या असं लक्षात आलेलं आहे की, मराठी चित्रपट हा बिझनेस म्हणून फार बरी गोष्ट नाहीये. म्हणजे तुम्ही असं म्हणता की, तुम्ही पाच-सहा चित्रपट केल्यानंतर एखाद्या चित्रपटात तुमचे गेलेले पैसे परत मिळतील. तर आपल्याकडे हे खूप अवघड आहे. दरवर्षी मराठी चित्रपटसृष्टीला साधारणपणे २०० कोटी रुपये तोटा होतो. याचं कारण चित्रपट रिकव्हर होण्याकरिता तुम्हाला थिएटर आणि ब्रॉडकास्ट हे जर तुम्ही पैशाचं साधन म्हटलं, तर या दोन्ही ठिकाणी कॉस्ट ऑफ प्रॉडक्शनपेक्षा जास्त उत्पन्न येत नाही. माझ्या माहितीप्रमाणे, गेल्या वर्षी सहा चित्रपट रिकव्हर झाले आणि १५० चित्रपटांची निर्मिती झाली. याला बुडत्याला काडीचा आधार या हिशोबाने अर्थसाह्य मिळतं. आपल्या शासनाकडून सबसिडी मिळते.
“व्यावसायिक गणित लक्षात आलं. आम्ही फक्त चित्रपट करत नाही, तर कार्यक्रम आणि मालिका करतो. तेव्हा लक्षात आलं की, टीव्ही मालिकांवर लक्ष केंद्रित करावं. खरं सांगायचं, तर आम्ही टीव्हीत कमावलं आणि सिनेमात गमावलं. त्यापेक्षाही दु:खाची गोष्ट ही आहे की, आपल्याकडे लोक चित्रपट बघायलाच येत नाहीत. लोक सगळे बिल फाडतात की, तुमचे चित्रपट चांगले नसतात म्हणून आम्ही बघायला येत नाही. पण, यात काही अर्थ नाही. सगळ्या सिनेमांबद्दल असं म्हणू शकत नाही. चांगले चित्रपट काढले तरी लोक बघायला येत नाहीत. चांगले चित्रपटच कशाला, चांगल्या मालिका केल्या तरी त्यांना जे बघायचं आहे, तेच ते बघतात. चांगलं काय आणि वाईट काय हे खूपच सापेक्ष आहे. आपल्याला वाटतं की, आपण चांगलं काम केलं आहे; पण त्याला समोरून तशा संख्येत पावती मिळत नाही. काय होतं की, कौतुकाची थाप देणारे भेटतात, पुरस्कार मिळतात; पण, तिकीट बारीवर ते दिसत नाही. मग त्या वेळेला आर्थिक नुकसान सोसून हे का करायचं, हा प्रश्न निर्माण होतो किंवा पैसेच संपतात”, असे म्हणत चित्रपट निर्मिती का थांबविली यावर श्रीरंग गोडबोले यांनी खुलासा केला आहे.