अभिनेत्री शुभांगी गोखलेंनी आपल्या सहजसुंदर अभिनयानं मराठी मनोरंजनसृष्टीत एक वेगळा ठसा उमटवला आहे. मोठ्या पडद्यापासून ते छोटा पडदा गाजवणाऱ्या अभिनेत्री म्हणून शुभांगी गोखलेंना ( Shubhangi Gokhale ) ओळखलं जातं. सध्या त्या विविध नाटक, मालिका, चित्रपटांमधून प्रेक्षकांचं मनोरंजन करत आहेत. अशा या हरहुन्नरी शुभांगी गोखले यांनी नुकतीच शिवरायांवर आधारित असलेल्या चित्रपटात काम करण्याची इच्छा व्यक्ती केली आहे.
काही दिवसांपूर्वी ‘झी चित्र गौरव पुरस्कार २०२५’ पार पडला. या पुरस्कार सोहळ्यात शुभांगी गोखलेंना ( Shubhangi Gokhale ) ‘घरत गणपती’ या चित्रपटासाठी नामांकन मिळालं होतं. ‘झी चित्र गौरव पुरस्कार’ सोहळ्याच्या वेळी शुभांगी गोखलेंनी अनेक माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांवर आधारित असलेल्या दिग्पाल लांजेकरांच्या चित्रपटात काम करण्यात इच्छा होती, असं सांगितलं.
‘टेली गप्पा’ या युट्यूब चॅनेलशी संवाद साधताना शुभांगी गोखलेंना ( Shubhangi Gokhale ) विचारलं की, ‘घरत गणपती’ व्यतिरिक्त तुम्हाला कोणत्या चित्रपटाचा भाग व्हायला आवडलं असतं? तेव्हा अभिनेत्री म्हणाल्या, “असे बरेच चित्रपट आहेत. पण, त्याच्यामध्ये मला कदाचित कास्ट करणार नाहीत. मात्र दिग्पाल लांजेकरांनी आतापर्यंत शिवरायांवर जे चित्रपट केले. त्याच्यामध्ये मला काम करायला आवडलं असतं. एका कोपऱ्यामध्ये बसलेला मावळ्याची भूमिका असती तरी मला चाललं असतं आणि मला आवडलं असतं.”
दरम्यान, शुभांगी गोखलेच्या कामाबद्दल बोलायचं झालं तर, त्या ‘प्रेमाची गोष्ट’ मालिकेबरोबर विविध नाटक, चित्रपटात काम करत आहेत. ‘प्रेमाची गोष्ट’ मालिकेत त्यांनी साकारलेली माधवी गोखले ही भूमिका प्रेक्षकांच्या चांगलीच पसंतीस पडली आहे. तसंच त्यांचं रंगभूमीवर ‘असेन मी नसेन मी’ हे नाटक जोरदार सुरू आहे. अमृता सुभाष दिग्दर्शित या नाटकाला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. ‘असेन मी नसेन मी’ नाटकात शुभांगी गोखले ( Shubhangi Gokhale ) यांच्याबरोबर नीना कुळकर्णी, अमृता सुभाष महत्त्वाच्या भूमिकेत आहेत. या नाटकातील तिघींच्या कामाचं प्रेक्षकांकडून नेहमी भरभरून कौतुक होतं असतं.