Siddharth Chandekar & Mitali Mayekar : सिद्धार्थ चांदेकर आणि मिताली मयेकर यांच्याकडे मराठी कलाविश्वातील आदर्श जोडपं म्हणून पाहिलं जातं. या दोघांचा चाहतावर्ग मोठ्या प्रमाणात आहे. एकमेकांना अनेक वर्षे डेट केल्यावर सिद्धार्थ-मितालीने २०२१ मध्ये लग्नगाठ बांधली. ही रोमँटिक जोडी ऑनस्क्रीन एकत्र केव्हा झळकणार याची चाहते आतुरतेने वाट पाहत होते. अखेर नव्या वर्षात या दोघांनीही चाहत्यांना आनंदाची बातमी देत त्यांच्या पहिल्या चित्रपटाची घोषणा केली आहे.
सिद्धार्थ चांदेकर आणि मिताली मयेकर हेमंत ढोमे दिग्दर्शित ‘फसक्लास दाभाडे’ चित्रपटात एकत्र स्क्रीन शेअर करणार आहेत. ‘फसक्लास दाभाडे’ या चित्रपटाचा टीझर काही दिवसांपूर्वीच प्रदर्शित झाला होता. चित्रपटाचा कौटुंबिक टीझर पाहून प्रेक्षकांच्या मनावर एक वेगळी छाप उमटली आहे. या चित्रपटाच्या गाण्यांना आणि टीझरला रसिकांनी प्रचंड प्रतिसाद दिला आहे. विशेषतः ‘यल्लो यल्लो’ गाण्यावर दाभाडे कुटुंबीयांनी जल्लोष साजरा केला असून हे गाणं सोशल मीडियावर, लग्नात प्रचंड गाजत आहे. या चित्रपटात क्षिती जोग, सिद्धार्थ चांदेकर, अमेय वाघ, निवेदिता सराफ, हरिश दुधाडे, राजन भिसे, आणि राजसी भावे यांच्या प्रमुख भूमिका आहेत.
सिद्धार्थ-मिताली पहिल्यांदाच एकत्र झळकणार
‘फसक्लास दाभाडे’ चित्रपटातलं लग्नाच्या आठवणींना उजाळा देणारं ‘दिस सरले’ हे गाणं सोशल मीडियावर प्रदर्शित करण्यात आलं आहे. या गाण्यात लग्नातील प्रत्येक भावनिक क्षणांचा एक सुंदर कोलाज पाहायला मिळत आहे. रुखवत तयार करण्यापासून नवरीच्या पाठवणीपर्यंत प्रत्येक प्रसंग या गाण्यात उत्कृष्टपणे मांडलेले आहेत. प्रत्येकाच्या मनातील भावना आणि लग्नातील हास्यविनोद यात दिसत आहेत. विशेष म्हणजे यात मिताली मयेकरची सिनेमातली पहिली झलक प्रेक्षकांना पाहायला मिळाली आहे.
‘फसक्लास दाभाडे’ या चित्रपटाच्या निमित्ताने सिद्धार्थ चांदेकर आणि मिताली मयेकर पहिल्यांदाच पडद्यावर एकत्र झळकणार आहेत. यात नेमकं त्यांचं नातं काय असेल, हे जाणून घेण्यासाठी प्रेक्षकांची उत्सुकता आता अधिकच वाढली आहे. अमितराज यांचं संगीत लाभलेल्या या गाण्याला क्षितिज पटवर्धन यांनी शब्दबद्ध केलं आहे. तर, हे गाणं हर्षवर्धन वावरे आणि आनंदी जोशी यांनी गायले आहे.
‘फसक्लास दाभाडे’ हा चित्रपट येत्या २४ जानेवारी २०२५ रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे. हेमंत ढोमे लिखित, दिग्दर्शित या चित्रपटाचे निर्माते भूषण कुमार, कृष्ण कुमार, आनंद एल राय आणि क्षिती जोग आहेत. चित्रपटाचे वितरण पॅनोरमा स्टुडिओजने केलेलं आहे.