सिद्धार्थ चांदेकर(Siddharth Chandekar) व मिताली मयेकर(Mitali Mayekar) ही मराठी कलाविश्वातील प्रेक्षकांच्या लाडक्या जोडप्यांपैकी एक आहे. या जोडीचा चाहतावर्ग मोठा आहे. अनेकविध कलाकृतीतून हे दोघेही प्रेक्षकांचे मनोरंजन करताना दिसतात. याबरोबरच, सोशल मीडियावरदेखील ते सक्रिय असल्याचे पाहायला मिळते. त्यांच्या फोटो, व्हिडीओ, रील्सना प्रेक्षकांची मोठी पसंती मिळते. आता हे सेलेब्रिटी जोडपे पहिल्यांदाच मोठ्या पडद्यावर एकत्र काम करताना दिसणार आहे. फसक्लास दाभाडे या चित्रपटाच्या निमित्ताने सिद्धार्थ व मिताली पहिल्यांदाच एकत्र काम करणार आहे. या चित्रपटात त्यांनी नवरा-बायकोची भूमिका साकारली आहे. या चित्रपटाची सर्वांनाच उत्सुकता आहे. आता मात्र, चित्रपटामुळे नाही तर सिद्धार्थच्या एका वक्तव्यामुळे हे जोडपे चर्चेत आहे. लग्नादिवशीच त्यांचे मोठे भांडण झाले होते, असा खुलासा त्यांनी एका मुलाखतीदरम्यान केला आहे.
त्यानंतर तीन तासांनी विधींना बसायचं होतं….
फर्स्टक्लास दाभाडे या चित्रपटाच्या टीमने नुकताच नवशक्ती या युट्यूब चॅनेलशी संवाद साधला. यावेळी बोलताना सिद्धार्थने त्याच्या लग्नातील आठवण सांगितली. सिद्धार्थने म्हटले, “आम्ही नाचून-नाचून थकलो होतो. त्यानंतर आमच्या दोघांचं भांडण झालं. भांडण वेगळ्याच कारणावरून सुरू झालं होतं. कारण छोटच होतं, त्याचं रूपांतर खूप मोठ्या भांडणामध्ये झालं होतं. हे पहाटे साडेतीन वाजता सुरू होतं. त्यानंतर तीन तासांनी विधींना बसायचं होतं. तर साडेतीन वाजता आमच्या भांडणाला सुरूवात झाली. त्यानंतर हिच्या खोलीत दोन मैत्रीणी होत्या, त्या बाहेर आल्या. माझे भाऊ, मित्र वैगेरे बाहेर आले. एका पॉइन्टनंतर ते असं विचारायला लागले की आलार्म लावू ना सकाळचा?लग्नासाठी उठायचं आहे ना? तुमचं काय ठरलं आहे? ते जेव्हा बाहेर आले तेव्हा आम्ही एकमेकांना तुझे नातेवाईक बघ ना, असे मोठमोठ्याने म्हणत होतो. “
पुढे मितालीने सांगितले की, जेव्हा आम्ही खूप भांडलो. त्यानंतर मी माझ्या खोलीत गेले. त्यानंतर पाच मिनिटानंतर सिद्धार्थ मला सॉरी म्हणायला आला.माझं चुकलं, सॉरी वैगेरे तो म्हणाला. त्यानंतर ते भांडण मिटलं, असे हसत मितालीने सांगितले.
दरम्यान, फसक्लास दाभाडे या चित्रपटात सिद्धार्थ चांदेकर, क्षिती जोग व अमेय वाघ या तिघांनी बहीण-भावांची भूमिका साकारली आहे. आता हा चित्रपट प्रेक्षकांच्या पसंतीस पडणार का, हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.